तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २१३६: धर्माचे पाळण
धर्माचे पाळण । करणें पाषांड खंडण ॥१॥ हें चि आह्मां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥ध्रु.॥ तीक्षण उत्तरें । हातीं घेउनि बाण फिरें ॥२॥ नाहीं भीड भार । तुका ह्मणे साना थोर ॥३॥
धर्माचे पालन करणे, आणि पाखंडाचे, म्हणजे धर्माच्या नावाने चाललेल्या ढोंगाचे, खंडन करणे, हेच आमचे काम. नामाचे बीज वाढवायचे, हेच आम्हाला करायचे आहे. तीक्ष्ण उत्तरांचे बाण हातात घेऊन मी फिरतो. तुकाराम महाराज म्हणतात, लहान असो की थोर, मला कोणाची भीडभाड नाही.