तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २२५६: कृपाळू सज्जन तुह्मी संतजन
कृपाळू सज्जन तुह्मी संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥१॥ आठवण तुह्मी द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥ अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥२॥ तुका ह्मणे तुह्मी निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षीना ॥३॥
संतजनहो, तुम्ही कृपाळू सज्जन आहात. माझ्यावर तुमचे एवढेच कृपादान असू द्या: पांडुरंगाला माझी आठवण करून द्या. काकुळतीला येऊन माझी कीव त्याला सांगा. मी अनाथ आहे, अपराधी आहे, पतितांमध्येही पुढचा आहे; पण मला त्याच्या पायांपासून वेगळे करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही मला त्याच्या हवाली केलेत, की मग हरी माझी उपेक्षा करणार नाही.