तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २२९५: मुखीं नाम हातीं मोक्ष
मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी ॥१॥ वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥ध्रु.॥ भस्म दंड न लगे काठी । तीर्था आटी भ्रमण ॥२॥ तुका ह्मणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥३॥
मुखात नाम असले, की मोक्ष हातात येतो. याची साक्ष पुष्कळांना पटली आहे. वैष्णवांचा, विठ्ठलभक्तांचा, माल अस्सल आहे. तो झटकन खऱ्या वस्तूपर्यंत, देवापर्यंत, पोहोचवतो. त्यासाठी अंगाला भस्म, हातात दंड किंवा काठी लागत नाही. तीर्थांसाठी कष्ट करत भटकावेही लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या भेटीला मग कोणतीच आडकाठी उरत नाही.