तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २३०६: हें चि दान देगा देवा
हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥ न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥२॥ तुका ह्मणे गर्भवासीं । सुखें घालावें आह्मासी ॥३॥
देवा, मला एवढेच दान दे: तुझा मला कधीही विसर पडू नये. मी आवडीने तुझे गुण गाईन; हीच माझी सगळी कमाई. मला मुक्ती नको, आणि संपत्तीही नको. मला नेहमी संतांची संगत दे. तुकाराम महाराज म्हणतात, हे मिळणार असेल, तर आम्हाला खुशाल पुन्हा पुन्हा आईच्या गर्भात घाल; पुन्हा जन्म घ्यायला आम्ही आनंदाने तयार आहोत.