तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २३९१: नाम घेतां न लगे मोल
नाम घेतां न लगे मोल । नाममंत्र नाहीं खोल ॥१॥ दों चि अक्षरांचें काम । उच्चारावें राम राम ॥ध्रु.॥ नाहीं वर्णधर्मयाती । नामीं अवघीं चि सरतीं ॥२॥ तुका ह्मणे नाम । चैतन्य निजधाम ॥३॥
नाम घ्यायला काही मोल लागत नाही. नाममंत्र खोल, गूढ नाही. फक्त दोन अक्षरांचे काम आहे: राम राम असा उच्चार करावा. इथे वर्ण, धर्म, जात यांचा प्रश्नच नाही. नामात सगळेच मान्य ठरतात. तुकाराम महाराज म्हणतात, नाम हेच चैतन्याचे, त्या जिवंत परमतत्त्वाचे, निजधाम आहे.