तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २८२१: भेटीलागीं जीवा लागलीसे आस
भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥ पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥ दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥ भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥३॥ तुका ह्मणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥४॥
देवा, तुझ्या भेटीची माझ्या जिवाला आस लागली आहे. रात्रंदिवस मी तुझी वाट पाहतो. चांदण्यावर जगणाऱ्या चकोर पक्ष्याला पौर्णिमेचा चंद्र म्हणजेच जीवन; तसे माझे मन तुझी वाट पाहते. दिवाळीला माहेरी नेण्यासाठी मूळ येईल, म्हणून सासरी असलेली लेक आसुसलेली असते; ती पंढरीची वाट पाहत राहते. भुकेले बाळ खूप रडते, पण वाट पाहते ती आईचीच. तुकाराम महाराज म्हणतात, मलाही अशीच भूक लागली आहे. देवा, धावत येऊन मला तुझे श्रीमुख दाखव.