तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २८९: न लगे चंदना सांगावा परिमळ
न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥ अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ध्रु.॥ सूर्य नाहीं जागे करीत या जना । प्रकाश किरणा कर ह्मून ॥२॥ तुका ह्मणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥३॥
आपला सुगंध सांगायला चंदनाला सगळ्या झाडाझुडपांना हाक मारून गोळा करावे लागत नाही. आत जे असते, ते आपल्या स्वभावानेच धावत बाहेर येते; कितीही धरून ठेवले, तरी आवरत नाही. सूर्य या लोकांना मुद्दाम जागे करीत नाही; तो प्रकाशाचा, किरणांचा उगमच आहे, म्हणून लोक आपोआप जागे होतात. तुकाराम महाराज म्हणतात, ढग मोरांना नाचवतो. जे खरे आहे, ते लपवू म्हटले तरी लपत नाही.