तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २९८: साधूनी बचनाग खाती तोळा तोळा
साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहवे ॥१॥ साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥२॥ असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका ह्मणे ॥३॥
सराव करून काही लोक बचनागासारखे जहाल विष तोळा तोळा खातात; इतरांना ते डोळ्यांनी पाहवतही नाही. सराव करून काही लोक साप हातात धरतात; इतर ते पाहूनच कापू लागतात. प्रयास केले, की असाध्य तेही साध्य होते. तुकाराम महाराज म्हणतात, याचे कारण अभ्यास, म्हणजे सततचा सराव.