तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ३०४६: पंढरीसी जा रे आलेनो संसारा
पंढरीसी जा रे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥ मागील परिहार पुढें नोव्हे सीण । जालिया दर्षण एकवेळा ॥२॥ तुका ह्मणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्तीं निवडेना ॥३॥
संसारात जन्माला आलेल्यांनो, पंढरीला जा रे. पांडुरंग, म्हणजे विठ्ठल, दीनांचा सोयरा आहे. भेटीच्या ओढीने तो उभा राहून तुमची वाट पाहतो आहे. तो कृपाळू तुम्हाला भेटायला घाईला आला आहे, उतावीळ झाला आहे. एकदा त्याचे दर्शन झाले, की मागचे सगळे पाप नाहीसे होते, आणि पुढे कसलाही शीण उरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तो आपल्या माणसाला दुसऱ्या कोणाच्या हाती देत नाही. एकदा तो मनात येऊन बसला, की मग त्याला वेगळा काढताच येत नाही.