तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ३१८: उजळावया आलों वाटा
उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥१॥ बोलविले बोल बोलें । धनीविठ्ठला सन्निध ॥ध्रु.॥ तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥२॥ तुका ह्मणे नये आह्मां । पुढें कामा गबाळ ॥३॥
मी वाटा उजळायला आलो आहे, खरे काय आणि खोटे काय, याचा निवाडा करायला. माझा धनी विठ्ठल; त्याच्या सान्निध्यात, तो जे बोल बोलवतो, तेच मी बोलतो. म्हणून माझ्या मनात कसलीही शंका नाही; एका स्वामीचे बळ माझ्या पाठीशी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, यापुढे गबाळ, ढिसाळ काही आमच्या कामाचे नाही.