तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ३१९०: क्षणक्षणा हा चि करावा विचार
क्षणक्षणा हा चि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥ नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥ध्रु.॥ संतसमागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमार्थी ॥२॥ तुका ह्मणे यहलोकींच्या वेव्हारें । नये डोळे धुरे भरूनि राहो ॥३॥
हा संसाराचा सागर तरून पार कसे जायचे, याचाच विचार क्षणोक्षणी करावा. हा देह नाशवंत आहे; तो सगळाच जाणार आहे. काळ आयुष्य खात चालला आहे; सावध राहा. संतांच्या संगतीची आवड धरावी, आणि परमार्थासाठी घाई करावी. तुकाराम महाराज म्हणतात, या जगाच्या व्यवहारांच्या धुराने आपले डोळे भरून राहू देऊ नयेत.