तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ३२०: बरा कुणबी केलों
बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥ भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥ विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥२॥ सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥३॥ गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥४॥ तुका ह्मणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥५॥
देवा, तू मला कुणबी केलेस, शेती करणाऱ्या जातीत जन्म दिलास, हे बरे झाले. नाहीतर मी दंभानेच मेलो असतो. देवराया, तू फार चांगले केलेस. हा तुका आनंदाने नाचतो, आणि तुझ्या पाया पडतो. माझ्यापाशी थोडी जरी विद्या असती, तरी मी अपायात पडलो असतो. संतांची सेवा माझ्या हातून चुकली असती; ही फुकटची नागवण झाली असती. गर्व आणि ताठा आला असता, तर मी यमाच्या वाटेने गेलो असतो. तुकाराम महाराज म्हणतात, मोठेपणाने आणि अभिमानाने नरकच वाट्याला येतात.