तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ३२५४: हरिनामवेली पावली विस्तार
हरिनामवेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार वोल्हावली ॥१॥ तेथें माझ्या मना होई पक्षिराज । साधावया काज तृप्तीचे या ॥ध्रु.॥ मुळींचिया बीजें दाखविली गोडी । लवकर चि जोडी जालियाची ॥२॥ तुका ह्मणे क्षणक्षणां जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥३॥
हरिनामाचा वेल चांगला पसरला आहे. फळांनी आणि फुलांनी लगडून तो हिरवागार डवरला आहे. माझ्या मना, तू तिथे पक्ष्यांचा राजा हो, आणि या तृप्तीचे काम साधून घे. मुळातल्या बीजानेच आपली गोडी दाखवली आहे, आणि जो लाभ व्हायचा तो लवकरच झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पण क्षणाक्षणाला वेळ निघून जातो आहे. ही रसाळ गोडी हातची निसटून जाईल.