तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ३४: आपुलिया हिता जो असे जागता
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥ गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥२॥ तुका ह्मणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥
जो आपल्या खऱ्या हिताविषयी सदा जागा असतो, त्याचे आई-वडील धन्य होत. ज्या कुळात अशी सात्त्विक, निर्मळ मनाची मुले-मुली जन्माला येतात, त्यांचा देवालाही आनंद वाटतो. अशी माणसे गीता आणि भागवत ऐकतात, आणि विठोबाचे चिंतन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाची सेवा मला घडली, तर माझ्या भाग्याला पारच उरणार नाही.