तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ४०१०: सावळे सुंदर रूप मनोहर
सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥ आणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड । तुझे नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥ जन्मोजन्मी ऐसें मागितलें तुज । आह्मांसी सहज द्यावें आतां ॥२॥ तुका ह्मणे तुज ऐसे दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आह्मां ॥३॥
पांडुरंगा, तुझे सावळे, सुंदर, मन मोहून टाकणारे रूप माझ्या हृदयात निरंतर राहू दे. आम्हाला दुसरी कोणतीही इच्छा नाही, कशाची ओढ नाही. तुझे नामच आम्हाला गोड लागते. जन्मोजन्मी मी तुझ्याकडे हेच मागत आलो आहे; आता ते आम्हाला सहजपणे देऊन टाक. तुकाराम महाराज म्हणतात, सगळीकडे धुंडाळून पाहिले, पण तुझ्यासारखा दयाळू आम्हाला कुठेही सापडला नाही.