तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ४०६९: वेद अनंत बोलिला
वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि साधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठा नाम गावें ॥ध्रु.॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतका चि निर्धार ॥२॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हा चि हेत ॥३॥
वेद अनंत बोलले, पण त्यांनी साधलेला अर्थ एवढाच: विठोबाला शरण जावे, आणि दृढ निष्ठेने त्याचे नाम गावे. सगळ्या शास्त्रांचा विचार शेवटी याच निर्धारावर येऊन थांबतो. तुकाराम महाराज म्हणतात, अठरा पुराणांचा सिद्धांत आणि हेतूही हाच आहे.