तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ४३१६: बोले तैसा चाले
बोले तैसा चाले । त्याचीं वंदीन पाउलें ॥१॥ अंगें झाडीन अंगण । त्याचें दासत्व करीन ॥ध्रु.॥ त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर ॥२॥ तुका ह्मणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ॥३॥
जो बोलतो तसाच वागतो, त्याची पावले मी वंदीन. मी स्वतः त्याचे अंगण झाडीन, आणि त्याचे दास्य करीन. मी त्याचा सेवक होईन, आणि हात जोडून त्याच्यापुढे उभा राहीन. तुकाराम महाराज म्हणतात, असा माणूस म्हणजेच देव; माझा भाव त्याच्या चरणी आहे.