तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ४४०९: पापाची वासना नको दावूं डोळां
पापाची वासना नको दावूं डोळां । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥ निंदेचें श्रवण नको माझे कानीं । बधिर करोनि ठेवीं देवा ॥ध्रु.॥ अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥२॥ नको मज कधीं परस्त्रीसंगति । जनांतुन मातीं उठतां भली ॥३॥ तुका ह्मणे मज अवघ्याचा कांटाळा । तूं एक गोपाळा आवडसी ॥४॥
देवा, माझ्या डोळ्यांना पापाची वासना दाखवू नकोस; त्याहून मी आंधळा असलेलाच बरा. कोणाची निंदा माझ्या कानांवर पडू देऊ नकोस; देवा, त्यापेक्षा मला बहिराच करून ठेव. अपवित्र बोलणे माझ्या तोंडी येऊ नये; त्याहून मी मुका असलेलाच बरा. परस्त्रीची संगत मला कधीही नको; त्यापेक्षा माणसांतून उठून मातीत जाणे बरे. तुकाराम महाराज म्हणतात, मला या सगळ्याचाच कंटाळा आला आहे. गोपाळा, गायी राखणाऱ्या कृष्णा, मला फक्त तूच आवडतोस.