तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ६२: शुद्धबीजा पोटीं
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥ मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥ध्रु.॥ सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥ तुका ह्मणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥
शुद्ध बीजाच्या पोटीच रसाळ, गोमटी फळे येतात. अशा माणसाच्या मुखात अमृतासारखी वाणी असते, आणि त्याचा देह चांगल्या कारणासाठी खर्ची पडत असतो. तो सर्वांगाने निर्मळ असतो, आणि त्याचे चित्त गंगेच्या पाण्यासारखे स्वच्छ असते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या नुसत्या दर्शनाने ताप निघून जातात, आणि जिवाला विसावा मिळतो.