तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ७५६: घेई माझे वाचे
घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥ तुह्मी घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥ तुह्मी ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥२॥ मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥३॥ तुका ह्मणे जीवां । नको सोडूं या केशवा ॥४॥
माझ्या वाणी, विठोबाचे गोड नाम घे. डोळ्यांनो, तुम्ही सुख घ्या रे; विठोबाचे मुख पाहा. कानांनो, तुम्ही माझ्या विठोबाचे गुण ऐका. मना, तू तिकडे धाव घे, आणि विठोबाच्या पायांपाशीच राहा. तुकाराम महाराज म्हणतात, जिवा, या केशवाला कधी सोडू नकोस.