तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ८७३: माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरु ॥१॥ पढियें देहभावें पुरवितो वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥ मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥ योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥ तुका ह्मणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥
माझ्या विठोबाचे प्रेम कसे आहे पाहा! तो स्वतः देव असून स्वतःच गुरूही होतो. देहाच्या भावात ज्या इच्छा प्रिय असतात, त्या तो पुरवतो, आणि शेवटी भक्ताला आपल्यापाशी नेतो. तो पुढे-मागे उभा राहून सांभाळ करतो. आलेले आघात निवारतो. संकटात त्याच्या योगक्षेमाची, म्हणजे सगळ्या गरजांची, काळजी तो जाणतो, आणि हाताला धरून वाट दाखवतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या मनात विश्वास नसेल, त्याने पुराणे विचार करून पाहावीत.