तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ९८६: काळ सारावा चिंतनें
काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥ युक्त आहार विहार । नेम इंद्रियांचा सार । नसावी बासर। निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥ परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥२॥ देह समर्पिजे देवा। भार कांहीं च न घ्यावा । होईल आघवा। तुका ह्मणे आनंद ॥३॥
आपला वेळ देवाच्या चिंतनात घालवावा: एकांतात राहावे, गंगास्नान करावे, देवाची पूजा करावी, आणि तुळशीला प्रदक्षिणा घालावी. आहार आणि वागणे-फिरणे बेताचे असावे; इंद्रियांवरचा नियम हेच खरे बळ. शिळे अन्न, फार झोप आणि फार बोलणे नसावे. परमार्थ हे मोठे धन आहे; त्यातून देवाचे चरण जोडले जातात. ते जपून राखण्यासाठी हे उपाय लाभाचे आहेत. देह देवाला अर्पण करावा, आणि कशाचेही ओझे स्वतःवर घेऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, मग सगळा आनंदच होईल.