तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ९९४: धन्य आजि दिन
धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ॥१॥ जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥ जालें समाधान । पायीं विसांवलें मन ॥२॥ तुका ह्मणे आले घरा। तो चि दिवाळीदसरा ॥३॥
आजचा दिवस धन्य आहे: संतांचे दर्शन घडले. पाप आणि ताप तुटून गेले, आणि दैन्य तत्क्षणी निघून गेले. मनाचे समाधान झाले; संतांच्या पायांशी मन विसावले. तुकाराम महाराज म्हणतात, संत घरी आले, तोच आमचा दिवाळी-दसरा.