श्रीरामकृष्ण परमहंस · एक ईश्वर, अनेक नावे
चैतन्यमय मूर्ती
“देवाला रूप असू शकेल हे तुम्ही मानता; पण लोक ज्या मातीच्या मूर्ती पूजतात, त्या म्हणजे देव नक्कीच नव्हे, असे तुम्ही म्हणता. अहो, तिला मातीची मूर्ती का म्हणता? ती दिव्य मूर्ती चैतन्याची बनलेली असते!”
कलकत्त्याहून आलेल्या एका श्रोत्याला देव मातीच्या मूर्तींत आहे याविषयी शंका होती; त्याला श्रीरामकृष्ण उत्तर देत होते. ब्राह्मसमाजाच्या शिकवणीप्रमाणे देवाची मूर्तीत पूजा करू नये, असे त्या काळच्या अनेक सुशिक्षित बंगाली लोकांचे मत होते. बंगालमध्ये देवदेवतांच्या मूर्ती मातीपासून घडवतात, रंगवतात, त्यांना वस्त्रे नेसवतात, आणि घरांत व देवळांत त्यांची पूजा करतात.