श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
आंबे खा
आमराईतले दोघे
श्रीरामकृष्णांनी ही गोष्ट सांगितली. दोन माणसे एका आमराईत गेली. त्यांच्यातला एक हुशार, व्यवहारी संसारी माणूस होता. फाटकातून आत शिरताच तो आंब्याची झाडे मोजू लागला. कोणत्या झाडाला किती आंबे लागले आहेत, ते त्याने मोजले, आणि सगळी आमराई अंदाजे किती किमतीची असेल, याचा हिशेब मांडला. दुसरा माणूस आमराईच्या मालकाकडे गेला, आणि त्याने त्याच्याशी ओळख करून घेतली. मग मालकाची परवानगी घेऊन तो शांतपणे एका आंब्याच्या झाडाखाली गेला, आंबे तोडू लागला, आणि खाऊ लागला. “आता या दोघांपैकी जास्त शहाणा कोण?” श्रीरामकृष्णांनी विचारले. “आंबे खा. त्याने तुमची भूक भागेल. पाने मोजून आणि उगाच हिशेब मांडून काय मिळणार? स्वतःच्या हुशारीचा गर्व असलेला माणूस उगाच खटपट करत राहतो. हे जग का निर्माण झाले, कसे निर्माण झाले, याचा हिशेब लावत बसतो. नम्र, शहाणा माणूस जग निर्माण करणाऱ्याशी ओळख करून घेतो, आणि याच जगात परम आनंद भोगतो.”