श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
अलिप्त गृहस्थ
ब्राह्मण आणि रुपया
एकजण श्रीरामकृष्णांसमोर संसारात, बायकामुलांत राहणाऱ्या गृहस्थाविषयी वाद घालत होता. त्याचे म्हणणे असे होते की असा माणूस कुटुंबात राहूनही घरच्या व्यवहारांशी काहीही संबंध ठेवत नाही, आणि म्हणून संसार त्याला शिवत नाही. उत्तरादाखल श्रीरामकृष्णांनी ही गोष्ट सांगितली. घरच्या व्यवहारांशी काहीही संबंध न ठेवणारे असे गृहस्थ असतात. त्यांच्यापैकी एकाकडे एकदा एक गरीब ब्राह्मण काही पैसे मागायला आला. ब्राह्मणाने पैसे मागितले, तेव्हा तो माणूस म्हणाला, “महाराज, मी पैशाला कधी हातसुद्धा लावत नाही. माझ्याकडे पैसे मागण्यात तुम्ही उगाच वेळ का घालवता?” पण ब्राह्मण काही जाईना. ब्राह्मणाच्या विनवण्यांना तो माणूस कंटाळला, आणि शेवटी त्याने ब्राह्मणाला एक रुपया द्यायचे ठरवले. तो म्हणाला, “बरे, महाराज, उद्या या. तुमच्यासाठी काय करता येते ते मी पाहतो.” मग हा आदर्श गृहस्थ आत गेला आणि बायकोशी बोलला. त्याचे सगळे व्यवहार तीच पाहत असे, कारण त्याचा त्यांच्याशी काही संबंध नसे. तो म्हणाला, “अगं, हे पाहा, एक गरीब ब्राह्मण मोठ्या अडचणीत आहे, आणि माझ्याकडे काहीतरी मागतो आहे. मी त्याला एक रुपया द्यायचे ठरवले आहे. तुला काय वाटते?” “रुपया” हा शब्द ऐकताच बायको एकदम उसळून म्हणाली, “अहाहा! केवढे दानशूर हो तुम्ही! रुपये म्हणजे काय झाडाची पाने आहेत, की दगड आहेत, विचार न करता फेकून द्यायला?”
अलिप्त गृहस्थ
दोन आणे
“अगं,” नवरा जणू सारवासारव करत म्हणाला, “तो माणूस फार गरीब आहे. त्याला रुपयापेक्षा कमी देऊ नये.” “मुळीच नाही!” बायको म्हणाली. “एवढे काही मला देता येणार नाही. हे घ्या दोन आण्यांचे नाणे. वाटले तर ते द्या त्याला.” आणा म्हणजे रुपयाचा सोळावा भाग. अर्थात त्या माणसापुढे दुसरा मार्गच नव्हता, कारण अशा संसारी गोष्टींशी त्याचा काही संबंधच नव्हता. बायकोने दिले ते त्याने घेतले. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण परत आला, आणि त्याला फक्त ते दोन आण्यांचे नाणेच मिळाले. “संसार आम्हाला शिवत नाही असे म्हणणारे असले गृहस्थ,” श्रीरामकृष्ण म्हणाले, “खरे म्हणजे बायकोच्या ताटाखालचे मांजर असतात. प्रत्येक गोष्टीत बायको सांगेल तसे ते वागतात. आणि म्हणूनच पुरुष या नात्याने ते अगदीच कुचकामी असतात.”