श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
चोर, दारुडा आणि साधू
वाटेच्या कडेला
श्रीरामकृष्णांनी ही गोष्ट सांगितली. एक साधू समाधी लागून रस्त्याच्या कडेला पडला होता. वाटेने जाणाऱ्या एका चोराने त्याला पाहिले, आणि त्याला वाटले, “इथे पडलेला हा इसम चोर आहे. रात्री कुठेतरी घरफोडी करत होता, आणि आता थकून झोपला आहे. पोलीस आता याला पकडायला येतीलच. वेळीच इथून सटकलेले बरे.” असा विचार करून तो चोर पळून गेला. थोड्या वेळाने एक दारुडा त्या साधूजवळ आला. “काय रे!” तो म्हणाला. “जरा जास्तच झाली, आणि खड्ड्यात पडलास. माझे पाय तुझ्यापेक्षा पक्के आहेत. मी नाही कोलमडणार.” सगळ्यात शेवटी एक साधू आला. तिथे एक थोर साधू समाधीत पडला आहे, हे त्याने ओळखले. तो त्या थोर साधूजवळ बसला, आणि त्याला स्पर्श करून हळुवारपणे त्याचे पवित्र पाय चेपू लागला.