श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
गवत खाणारा वाघ
शेळ्यांमध्ये
श्रीरामकृष्ण म्हणाले, की काही लोकांना वाटते, आपण बंधनात अडकलो आहोत, आपल्याला देवाचे ज्ञान किंवा देवाचे प्रेम कधीच मिळणार नाही. पण गुरूंची कृपा झाली, तर ही सगळी भीती जाते. त्यांनी ही गोष्ट सांगितली. एकदा एका वाघिणीने शेळ्यांच्या कळपावर झडप घातली. सावजावर उडी घेताना तिने एका बछड्याला जन्म दिला, आणि ती मेली. शेळ्यांनी त्या बछड्याला आपल्यातच वाढवले. शेळ्या गवत खात, तसा बछडाही गवत खाई. त्या बें बें करत, तसा बछडाही बें बें करी. असा तो वाढून पूर्ण मोठा झाला. एके दिवशी एक मोठा वाघ तिकडून आला. गवत खाणाऱ्या या वाघाकडे तो थक्क होऊन पाहत राहिला. त्याने धावत जाऊन त्या गवत खाणाऱ्या वाघाला पकडले, तसा तो बें बें करू लागला. मग मोठा वाघ त्याला ओढत पाण्याच्या काठावर घेऊन गेला, आणि म्हणाला, “हे बघ! पाण्यात तुझे तोंड बघ. अगदी माझ्यासारखे आहे! आणि हे घे, हे मांस खा.” असे म्हणून त्याने मांसाचे काही तुकडे त्याच्या तोंडात कोंबले. आधी तो ते खाईना; नुसता केविलवाणे बें बें करत राहिला. पण रक्ताची चव लागताच तो खाऊ लागला. मग मोठा वाघ म्हणाला, “आता कळले ना, तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही. चल, माझ्यामागून जंगलात चल!” “म्हणून मी म्हणतो,” श्रीरामकृष्ण म्हणाले, “गुरूंची कृपा झाली, तर तुमच्या मनातली सगळी भीती निघून जाईल. तुम्ही कोण आहात, तुमचे खरे स्वरूप काय आहे, ते गुरूच तुम्हाला दाखवतील.”