श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
हरवलेले पत्र
पाच शेर मिठाई
नाटककार गिरीश घोष यांनी एकदा श्रीरामकृष्णांना सांगितले की, लहानपणी त्यांनी अभ्यासाकडे कधी लक्षच दिले नव्हते, तरीही लोक त्यांना विद्वान म्हणायचे सोडत नाहीत. श्रीरामकृष्ण हसले. ते म्हणाले, “मला याविषयी काय वाटते, ठाऊक आहे? ग्रंथ, पवित्र शास्त्रे, हे सगळे देवाकडे जाणारी वाट दाखवतात. एकदा वाट कळली, की मग ग्रंथांचा काय उपयोग? मग एकांतात, देवाच्या सहवासात, आध्यात्मिक प्रगती करायची वेळ येते.” आणि त्यांनी ही गोष्ट सांगितली. एका माणसाला एक पत्र आले होते. त्यात त्याला त्याच्या नातेवाइकांकडे काही वस्तू पाठवायला सांगितले होते. तो त्या वस्तू विकत आणायला सांगणारच होता, तेवढ्यात त्याने पत्र शोधले, तर ते सापडेना. त्याने बराच वेळ शोधाशोध केली, आणि घरातली माणसेही त्याच्याबरोबर शोधू लागली. शेवटी पत्र सापडले, आणि त्याच्या आनंदाला सीमा उरली नाही. त्याने उत्सुकतेने ते हातात घेतले, आणि सगळे वाचून काढले. त्यात लिहिले होते, “कृपा करून पाच शेर मिठाई आणि एक कापड पाठवा.” त्यात काय लिहिले आहे ते कळताच त्याने पत्र बाजूला फेकून दिले, आणि तो वस्तू जमवायला निघाला. “तर मग असल्या पत्राची माणसाला किती वेळ पर्वा असते?” श्रीरामकृष्ण म्हणाले. “त्यात काय लिहिले आहे हे कळत नाही, तोपर्यंतच. पुढची पायरी म्हणजे त्यात मागितलेल्या वस्तू मिळवायचा प्रयत्न करणे. तसेच, पवित्र ग्रंथ आपल्याला फक्त देवाकडे जाणारी वाट सांगतात, म्हणजे माणूस कोणत्या मार्गाने देवाला जाणतो ते सांगतात. एकदा वाट कळली, की पुढची पायरी म्हणजे स्वतः प्रयत्न करत ध्येयापर्यंत पोचणे. आणि ते ध्येय म्हणजे स्वतः देवाला जाणणे.”