श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
कलकत्त्याचे अनेक रस्ते
वाटसरू
श्रीरामकृष्णांनी ही गोष्ट सांगितली. कलकत्त्याला अनेक रस्ते जातात. एक माणूस दूरच्या गावातल्या आपल्या घरून त्या मोठ्या शहराला जायला निघाला. त्याने वाटेत एका माणसाला विचारले, “कलकत्त्याला लवकर पोचायचे आहे, कोणता रस्ता धरू?” तो माणूस म्हणाला, “हा रस्ता धरा.” थोडे अंतर गेल्यावर वाटसरूला दुसरा एक माणूस भेटला. वाटसरूने त्याला विचारले, “कलकत्त्याला जायचा सर्वांत जवळचा रस्ता हाच ना?” तो माणूस म्हणाला, “छे, छे! आलात त्या वाटेने परत जा, आणि डावीकडचा रस्ता धरा.” वाटसरूने तसे केले. या नव्या रस्त्याने तो काही अंतर गेला, तोच त्याला तिसरा एक माणूस भेटला. त्या माणसाने त्याला कलकत्त्याचा आणखी एक वेगळाच रस्ता दाखवला. अशा रीतीने वाटसरू काही पुढे सरकला नाही, आणि एक रस्ता सोडून दुसरा धरण्यातच त्याचा सगळा दिवस गेला. त्याला कलकत्त्याला पोचायचे होते, तर त्याने पहिल्यांदा ज्याला विचारले, त्या माणसाने दाखवलेल्या रस्त्यानेच जायला हवे होते. “तसेच,” श्रीरामकृष्ण म्हणाले, “ज्यांना देवापर्यंत पोचायचे आहे, त्यांनी एकाच वाटाड्याच्या मागे जावे. एकाच, फक्त एकाच.”