श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
नारद आणि तेलाची वाटी
दोनदा हरी म्हणणारा शेतकरी
श्रीरामकृष्णांनी ही गोष्ट सांगितली. एकदा देवर्षी नारदांच्या मनात गर्व शिरला. स्वतःपेक्षा मोठा भक्त कोणीच नाही, असे त्यांना वाटू लागले. भगवान विष्णूंनी त्यांच्या मनातले ओळखले. ते म्हणाले, “नारदा, अमुक अमुक ठिकाणी जा. तिथे माझा एक मोठा भक्त आहे. त्याची ओळख करून घे.” नारद तिथे गेले, तर तिथे त्यांना एक शेतकरी भेटला. तो शेतकरी पहाटे उठून एकदाच हरीचे नाव घेत असे. मग नांगर घेऊन दिवसभर जमीन नांगरायला जात असे. रात्री पुन्हा एकदा हरीचे नाव घेऊन तो झोपी जात असे. नारद मनाशी म्हणाले, “या साध्या शेतकऱ्याला देवाचा भक्त कसे म्हणायचे? हा दिवसभर संसाराच्या कामात गुंतलेला असतो, असे मला दिसते. धार्मिक माणसाचे एकही लक्षण मला याच्यात दिसत नाही.”
नारद आणि तेलाची वाटी
नगराभोवती फेरी
नारद भगवंतांकडे परत गेले. आपल्या या नव्या ओळखीच्या माणसाविषयी त्यांना जे जे वाटले, ते सगळे त्यांनी भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, “नारदा, तेलाने भरलेली ही वाटी घे. या नगराला एक फेरी मार, आणि ही वाटी घेऊन परत ये. पण त्यातला एक थेंबही जमिनीवर सांडणार नाही, याची काळजी घे.” सांगितल्याप्रमाणे नारदांनी केले. ते परत आले, तेव्हा भगवंतांनी विचारले, “काय नारदा, फेरी मारताना तुला किती वेळा माझी आठवण झाली?” “एकदाही नाही, प्रभू,” नारद म्हणाले. “आणि होणार तरी कशी? काठोकाठ भरलेल्या या तेलाच्या वाटीवर मला सारखे लक्ष ठेवावे लागत होते.” मग भगवंत म्हणाले, “या एका तेलाच्या वाटीने तुझे लक्ष एवढे वेधून घेतले, की तूसुद्धा मला पार विसरलास. पण त्या शेतकऱ्याकडे पाहा. संसाराचे जड ओझे तो वाहतो, आणि तरीही रोज दोनदा माझी आठवण काढतो.”