श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
निताईचे माशाचे कालवण
गौर आणि निताई
श्रीरामकृष्ण म्हणाले, की संसारी लोकांना सगळे सोडून प्रभूच्या चरणकमळी स्वतःला वाहून घ्यायला सांगितले, तर ते कधीच तसे करणार नाहीत. म्हणूनच गौर आणि निताई या दोघा भावांनी आपसात विचार केला, आणि अशा लोकांना ओढून आणायची एक युक्ती काढली. गौर म्हणजे श्रीचैतन्य, बंगालचे वैष्णव संत. निताई, म्हणजे नित्यानंद, हे त्यांचे जवळचे सोबती. ते म्हणाले, “या, हरीचे नाव घ्या, म्हणजे तुम्हाला मागूर माशाचे चविष्ट कालवण मिळेल, आणि तरुण स्त्रीचे आलिंगन मिळेल!” मागूर हा बंगालमध्ये फार आवडीने खाल्ला जाणारा एक मासा. त्या शेवटच्या दोन गोष्टींच्या ओढीने पुष्कळ लोक प्रभूचे नाव घ्यायला आले. मग त्यांना नामाच्या अमृताची थोडी चव लागली. आणि त्यांना कळले, की ते ‘माशाचे कालवण’ दुसरे काही नसून, देवाच्या प्रेमात त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा होत्या. देवप्रेमात बेभान होऊन ते जमिनीवर लोळले. ते लोळणे म्हणजेच ‘आलिंगन’, आणि ती धरणी म्हणजेच ‘तरुण स्त्री’.