श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
पळणारी म्हातारी निकषा
निकषा का पळाली
श्रीरामकृष्ण म्हणाले, की देवाचा साक्षात्कार झाल्यावर भक्ताला देवाची या जगातली लीला पाहावीशी वाटते. त्यांनी ही गोष्ट सांगितली. लंकेचा राक्षसराजा रावण याचा पाडाव झाला होता. राम आणि लक्ष्मण त्याच्या नगरीत शिरले, आणि पुढे रावणाच्या महालात गेले. तिथे त्यांना रावणाची आई, म्हातारी निकषा, पळून जाताना दिसली. लक्ष्मणाला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, “रामा, हे काय? निकषा इतकी म्हातारी आहे. मुलगे गेल्याचे केवढे दुःख तिने सोसले आहे. तरी तिला जिवाचा इतका लोभ, की ती पळून चालली आहे!” रामांनी तिला भिऊ नकोस असे सांगितले, आणि जवळ बोलावले. “तू का पळत होतीस?” त्यांनी विचारले. निकषा म्हणाली, “रामा, मी भीतीने पळत नव्हते. मी इतकी वर्षे जगले, म्हणून तर तुझी इतकी लीला पाहायला मिळाली. आणखी जगले, तर तुझी आणखी लीला पाहीन. म्हणून मला जगावेसे वाटते.”