श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
फकीर आणि अकबर
रानातला फकीर
श्रीरामकृष्णांनी ही गोष्ट सांगितली. अकबर बादशहाच्या काळात दिल्लीजवळच्या एका रानात एक फकीर झोपडीत राहत असे. त्याच्याकडे पुष्कळ लोक येत. पण त्यांचे आदरातिथ्य करायला त्याच्याजवळ काहीच नव्हते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. म्हणून तो अकबर बादशहाकडे मदत मागायला गेला. साधुसंतांवर दया करणारा म्हणून अकबर प्रसिद्ध होता. त्या वेळी अकबर प्रार्थना करत होता. फकीर प्रार्थनेच्या खोलीत जाऊन बसला. प्रार्थनेत अकबराचे हे शब्द ऐकू आले: “हे परमेश्वरा, मला आणखी संपत्ती दे, आणखी सत्ता दे, आणखी जमीन दे.” ते ऐकताच फकीर उठला, आणि हळूच खोलीबाहेर निसटणार, इतक्यात बादशहाने खुणेनेच त्याला पुन्हा बसायला सांगितले.
फकीर आणि अकबर
तोही भिकारीच
प्रार्थना संपल्यावर अकबराने फकिराला विचारले, “तुम्ही मला भेटायला आला होतात. मग मला काहीच न सांगता का निघाला होतात?” फकीर म्हणाला, “बादशहा सलामतांकडे मी आलो होतो, त्याचे कारण... जाऊ द्या, त्यासाठी तुम्हाला त्रास द्यायची गरज नाही.” काय हवे आहे ते सांगा, असा अकबराने पुन्हा पुन्हा आग्रह धरला. शेवटी फकीर म्हणाला, “हुजूर, पुष्कळ लोक माझ्याकडे शिकायला येतात. पण पैशाअभावी मी त्यांची काहीच सोय करू शकत नाही. म्हणून बादशहा सलामतांकडे मदत मागावी, असे मला वाटले.” मग अकबराने विचारले, की आल्याचे कारण न सांगताच फकीर निघून का चालला होता. फकीर म्हणाला, “मी पाहिले, की तुम्हीही भिकारीच आहात. परमेश्वराकडे संपत्ती, सत्ता आणि जमीन मागत आहात. तेव्हा मी मनाशी म्हटले, ‘जो स्वतःच भिकारी आहे, त्याच्याकडे मी कशाला भीक मागू? मागायचेच तर परमेश्वराकडेच मागावे—भीक मागितल्याशिवाय भागणारच नसेल तर!’”