श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
पुजाऱ्याचा नवा नोकर
चांभार गप्प राहतो
श्रीरामकृष्णांनी मायेविषयी ही गोष्ट सांगितली. ही एका ब्राह्मण पुजाऱ्याची आणि त्याच्या खालच्या जातीच्या नोकराची गोष्ट आहे. एकदा एक पुजारी आपल्या एका शिष्याच्या गावाला चालला होता. त्याच्याबरोबर कोणी नोकर नव्हता. वाटेत त्याला एक चांभार दिसला. पुजाऱ्याने त्याला हाक मारली, “काय रे भल्या माणसा! माझा नोकर म्हणून माझ्याबरोबर येतोस का? पोटभर चांगले खायला मिळेल, तुझी सगळी चांगली सोय होईल. चल.” चांभार म्हणाला, “महाराज, मी सगळ्यात खालच्या जातीचा आहे. मी तुमचा नोकर म्हणून कसा खपून जाईन?” “त्याची फिकीर करू नकोस,” पुजारी म्हणाला. “तू कोण आहेस ते कोणाला सांगू नकोस. कोणाशी बोलू नकोस, आणि कोणाशी ओळखही करून घेऊ नकोस.” चांभाराने ते कबूल केले. तिन्हीसांजेला पुजारी शिष्याच्या घरी पूजेला बसला होता. तेव्हा दुसरा एक ब्राह्मण पुजाऱ्याच्या नोकराजवळ आला. “ए,” तो म्हणाला, “तिकडे माझे जोडे आहेत, ते घेऊन ये.” धन्याने सांगितल्याप्रमाणे नोकर काहीच बोलला नाही. ब्राह्मणाने दुसऱ्यांदा सांगितले, तरी नोकर गप्पच राहिला. ब्राह्मणाने पुन्हा पुन्हा सांगितले, पण चांभार जागचा तसूभरही हलला नाही. शेवटी ब्राह्मणाचा धीर सुटला. तो रागाने म्हणाला, “ए, तू! ब्राह्मणाचा हुकूम न मानायची तुझी हिंमत कशी झाली? तुझी जात कोणती? तू चांभार तर नाहीस ना?” हे ऐकताच चांभार भीतीने थरथर कापू लागला. त्याने पुजाऱ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिले, आणि तो म्हणाला, “महाराज! अहो महाराज! माझे बिंग फुटले. आता मला इथे राहता येणार नाही. मला पळू द्या!” असे म्हणून त्याने धूम ठोकली. “मायेचेही असेच आहे,” श्रीरामकृष्ण म्हणाले. “तिचे बिंग फुटले, की ती पळून जाते.”