श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
साधू झालेला मासेचोर
बागेतला चोर
श्रीरामकृष्ण साधनेविषयी आणि गुरूच्या कृपेविषयी बोलत होते. “माणसाने थोडी जरी साधना केली,” ते म्हणाले, “तरी कशात काय आहे, ते गुरू त्याला समजावून देतात. मग खरे काय आणि खोटे काय, हे तो ओळखू लागतो: एक देवच नित्य आहे, आणि हे जग टिकणारे नाही.” आणि त्यांनी ही गोष्ट सांगितली. एका रात्री एक कोळी गुपचूप एका बागेत शिरला. मासे चोरण्यासाठी त्याने बागेतल्या तळ्यात जाळे टाकले. बागेच्या मालकाला ते कळले. त्याने आपल्या माणसांसह चोराला घेरले, आणि पेटत्या मशाली घेऊन ते त्याला पकडायला आले. तेवढ्यात चोराने अंगाला राख फासली, आणि तो साधूसारखा एका झाडाखाली बसला. माणसांनी कोळ्याला खूप शोधले, पण व्यर्थ. त्यांना दिसला तो फक्त अंगाला राख फासून झाडाखाली ध्यानमग्न बसलेला एक तपस्वी. दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी पसरली, की बागेत एक मोठा महात्मा आला आहे. फुले आणि मिठाई घेऊन लोकांची गर्दी त्याच्या दर्शनाला आली. त्याच्यासमोर चांदीच्या नाण्यांचा चांगलाच ढीग जमू लागला. ते पाहून कोळी मनात म्हणाला, “काय आश्चर्य! मी खरा साधू नाही, तरी लोक माझा एवढा आदर करतात. मग मी खरोखर साधू झालो, तर मला देवाचा साक्षात्कार नक्कीच होईल!” “साधनेच्या नुसत्या सोंगाने तो असा जागा झाला,” श्रीरामकृष्ण म्हणाले, “तर खऱ्या साधनेचे काय सांगावे! मग खरे काय आणि खोटे काय, हे तुम्हाला नक्की दिसेल. देव सत्य आहे आणि जग मिथ्या आहे, हे तुम्ही नक्की जाणाल.”