श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
शंकराचार्य आणि चांडाळ
कोणी कोणाला शिवले?
श्रीरामकृष्णांनी ही गोष्ट नरेंद्रला सांगितली. नरेंद्र हा त्यांचा एक तरुण शिष्य; पुढे तो स्वामी विवेकानंद झाला. एक चांडाळ कापलेल्या जनावरांचे मांस घेऊन चालला होता. खांद्यावरच्या कावडीच्या दोन्ही टोकांना टोपल्या टांगलेल्या होत्या, आणि त्यांत ते मांस होते. त्या काळच्या उच्च जातींचे लोक मानत, की चांडाळाच्या स्पर्शाने विटाळ होतो. वाटेत त्या चांडाळाला शंकराचार्य भेटले. शंकराचार्य हे हिंदू धर्मातले संत आणि सुधारक. ते गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करून चालले होते. योगायोगाने त्या चांडाळाचा शंकराचार्यांना स्पर्श झाला. शंकराचार्य संतापले आणि ओरडले, “अरे, तू मला शिवलास!” चांडाळ म्हणाला, “महाराज, मी तुम्हाला शिवलो नाही, आणि तुम्ही मला शिवला नाहीत. माझ्याबरोबर विचार करा, आणि मला सांगा: तुमचा खरा आत्मा म्हणजे शरीर, की मन, की बुद्धी? खरे तुम्ही कोण आहात, ते सांगा. “तुम्हाला ठाऊकच आहे, की जग ज्या तीन गुणांनी बनले आहे, त्यांपैकी कोणत्याही गुणात खरा आत्मा बांधलेला नसतो. ते तीन गुण असे: देवाकडे नेणारे ईश्वरप्रेम आणि त्याग; कर्माकडे नेणारी धडपड; आणि माणसाला देवापासून दूर नेणारे अज्ञान.”