श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
शेतकऱ्याचा पण
दुष्काळ
ब्राह्मसमाजाचे प्रचारक विजयकृष्ण गोस्वामी श्रोत्यांमध्ये होते. त्यांनी श्रीरामकृष्णांना विचारले, “संसारात बद्ध असलेल्या माणसाला मुक्तीची ओढ लागायची, तर आधी त्याच्या मनाची अवस्था कशी असावी लागते?” श्रीरामकृष्ण म्हणाले की, त्याला आधी देवाच्या कृपेने तीव्र वैराग्य यायला हवे. “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो,” ते म्हणाले. एकदा एका देशात फार मोठा दुष्काळ पडला. शेतात पाणी नेण्यासाठी शेतकऱ्यांना लांबलांब पाट खणावे लागले. त्यांच्यातला एक शेतकरी फार निश्चयी होता. शेतात पाणी आणल्याशिवाय, शेत नदीला जोडल्याशिवाय खणणे थांबवायचे नाही, असा पण त्याने एके दिवशी केला. मग तो कामाला लागला. अंघोळीची वेळ झाली, तेव्हा त्याची मुलगी आईने दिलेले तेल घेऊन आली. “बाबा,” ती म्हणाली, “तेल लावून अंघोळ करायची वेळ झाली.” “तू आता जा,” तो म्हणाला. “मला अजून खूप काम आहे.” आणि दुपारी एक वाजेपर्यंत तो काम करत राहिला, करतच राहिला. अंघोळीची त्याला आठवणही झाली नाही. मग त्याची बायको स्वतः शेतावर आली. “अजून अंघोळ का केली नाही?” ती म्हणाली. “जेवण गार होते आहे. तुमचे नेहमीच सगळे अति असते. काम उद्या संपवता येईल, नाहीतर जेवण झाल्यावर.” ते ऐकून शेतकऱ्याने तिला रागारागाने शिव्या घातल्या, आणि कुदळ घेऊन तो तिच्यावर धावून गेला. “तू मूर्ख आहेस का?” तो ओरडला. “पाऊस नाही, पिके करपून चालली आहेत. आपली मुले खाणार काय? तुम्ही सगळे उपाशी मराल, एवढे कळत नाही का? आधी शेतात पाणी आणायचा पण मी केला आहे. मगच मी अंघोळीचा आणि जेवणाचा विचार करीन.”
शेतकऱ्याचा पण
दोन शेतकरी
बायको घाबरून पळून गेली. तो माणूस दिवसभर खणत राहिला, खणतच राहिला, आणि शेवटी त्याचे शेत नदीला जोडले गेले. मग एका बाजूला बसून तो झुळझुळ आवाज करत शेतात शिरणारे नदीचे पाणी पाहू लागला. तेव्हा त्याचे मन खोल समाधानाने आणि आनंदाने भरून आले. मग तो घरी गेला, आणि त्याने बायकोला हाक मारली. “आता तेल दे,” तो म्हणाला, “आणि माझी तंबाखू तयार कर.” मग त्याने अंघोळ केली, जेवण केले, आणि हलक्या, आनंदी मनाने तो झोपी गेला. “असा जबरदस्त निश्चय,” श्रीरामकृष्ण म्हणाले, “हाच तीव्र वैराग्याचा गाभा आहे. “आता आणखी एक शेतकरी होता. तोही स्वतःच्या जमिनीत पाणी आणण्यासाठी खणत होता. फार उशीर झाला आहे, एवढा अतिरेक करू नये, आता घरी चलावे, असे त्याच्या बायकोने तिथे जाऊन सांगितले. तेव्हा त्याने जराही विरोध केला नाही. त्याने लगेच कुदळ खाली ठेवली, आणि तो म्हणाला, ‘तू म्हणतेस तसे. चल, जाऊ या.’” हे ऐकून श्रोते हसले. “आणि त्या माणसाच्या शेतात कधीच पाणी आले नाही,” श्रीरामकृष्ण म्हणाले. “मंद वैराग्य असे असते. जबरदस्त निश्चयाशिवाय शेतकऱ्याला शेतात पाणी आणता आले नाही; तसेच, जबरदस्त निश्चयाशिवाय कोणालाही देवाला जाणता येत नाही.”