श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
ताइतातले रामनाम
पाण्यावरून चालत
श्रीरामकृष्णांनी ही गोष्ट सांगितली. एका माणसाला नदी पार करायची होती. एका साधूने त्याला एक ताईत दिला, आणि म्हटले, “हा तुला पलीकडे नेईल.” तो माणूस ताईत हातात घेऊन पाण्यावरून चालू लागला. नदीच्या मध्यावर पोचल्यावर त्याला कुतूहल वाटले. आत काय आहे ते पाहायला त्याने ताईत उघडला. आत कागदाचा एक चिटोरा होता, आणि त्यावर पवित्र रामनाम लिहिलेले होते. “एवढेच काय याचे रहस्य?” तो माणूस तुच्छतेने म्हणाला. असे म्हणाला न म्हणाला, तोच तो बुडाला. “चमत्कार घडवते ती भगवंताच्या नावावरची श्रद्धा,” श्रीरामकृष्ण म्हणाले, “कारण श्रद्धा म्हणजे जीवन, आणि संशय म्हणजे मृत्यू.”