श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शन
पंगतीतला गलका
“जोपर्यंत माणूस देवाविषयी प्रश्न करत राहतो, तर्क लढवत राहतो, तोपर्यंत देव खरोखर आहे हे त्याने पाहिलेले नसते. तुम्ही दोघे वाद घालत होता. मला ते आवडले नाही. “मोठ्या पंगतीचे जेवण असलेल्या घरात गलका किती वेळ चालतो? लोक जेवायला लागेपर्यंतच. पाने वाढली आणि पाहुणे जेवू लागले, की पाऊण गलका थांबतो. मग गोड पदार्थ येतात: ते पानात जितके जास्त पडतात, तितका आवाज कमी होत जातो. शेवटचा पदार्थ, दही, वाढायची वेळ येते, तेव्हा एकच आवाज ऐकू येतो: ‘सुर्र-सुर्र’. आणि जेवण आटोपले, की पाहुण्यांचे पुढचे काम म्हणजे झोपणे! “तुम्ही देवाच्या जितके जवळ जाल, तितकी प्रश्न आणि तर्क करण्याची इच्छा कमी होईल. तुम्ही त्यांच्यापाशी पोचलात, देव खरोखर आहे हे तुम्ही पाहिलेत, की सगळा गलका, सगळे वाद संपतात. मग झोपेची वेळ: समाधीत मिळणाऱ्या आनंदाची; त्या समाधीत माणूस देवाशी एकरूप झालेला असतो.”
श्रीरामकृष्ण नरेंद्रांशी बोलत होते; हेच तरुण नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद झाले. नरेंद्र नुकतेच नाटककार गिरीश घोष यांच्याशी वाद घालत होते: देव मानवी देह धारण करतो की नाही, यावर. ‘सुर्र-सुर्र’ हा पाहुणे दही भुरकत असतानाचा आवाज.