श्रीरामकृष्ण परमहंस · साधना
‘सहन कर’ म्हणणारी तीन अक्षरे
“बंगाली वर्णमालेत श, ष, स ही तीन अक्षरे सोडली, तर एकसारखा उच्चार असलेली तीन अक्षरे दुसरी नाहीत. आणि ही तिन्ही म्हणतात, ‘सहन कर, सहन कर, सहन कर.’ यावरून दिसते, की लहानपणी अगदी मुळाक्षरांपासूनच आपल्याला सहनशीलता शिकवली जाते. प्रत्येक माणसासाठी सहनशीलता हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे.”
बंगालीत श, ष, स ही तीन अक्षरे लिहितात, पण तिन्हींचा उच्चार जवळजवळ सारखाच, ‘शो’सारखा करतात. श्रीरामकृष्णांच्या कानाला हा ‘शो’ म्हणजे बंगालीतला ‘सहन कर’ असे वाटे; तेही तीनदा.