श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि माया
घरची माणसे आणि सर्व जीव
“आज माझे मन स्वस्थ नाही. हृदयची तब्येत फार बिघडली आहे, असे कानावर आले. माया म्हणजे काय, ठाऊक आहे? स्वतःचे वडील, आई, भाऊ, बहीण, बायको, मुले, भाचे-पुतणे वगैरेंवरचे प्रेम म्हणजे माया. दया म्हणजे सर्व जीवांवर प्रेम करणे. आता ही माझी काळजी कसली? ही आसक्ती, की दया?”
हृदय हा श्रीरामकृष्णांचा दूरच्या नात्यातला भाचा. त्याने दक्षिणेश्वरच्या मंदिरात अनेक वर्षे श्रीरामकृष्णांची सेवा केली. बंगालीत माया (म्हणजे आसक्ती) आणि दया यांना एकमेकांसमोर उभे केले आहे. श्रीरामकृष्णांनी हा प्रश्न एका शिष्याला विचारला; त्याला काय उत्तर द्यावे ते सुचले नाही. श्रीरामकृष्णांनी स्वतःही उत्तर दिले नाही; हृदयने किती सेवा केली होती, ते मात्र त्यांनी पुढे सांगितले.