बंगालच्या लोककथा
दोन चोर
प्रामाणिक कष्ट
एका गावात दोन चोर राहत होते. चोरी हाच त्यांचा धंदा होता. ते इतके नामचीन होते, की गावात कुठेही चोरी झाली, तरी लोक त्यांनाच दोष देत. मग ती त्यांनी केलेली असो वा नसो. म्हणून त्यांनी गाव सोडले. आता प्रामाणिक कष्टाने जगायचे, असे त्यांनी ठरवले. आणि नोकरी शोधायला ते जवळच्या एका शहरात गेले. एका गृहस्थाने दोघांनाही कामावर ठेवले. एकाने त्याची गाय राखायची, आणि दुसऱ्याने चाफ्याच्या एका रोपाला पाणी घालायचे. थोरला चोर सकाळीच रोपाला पाणी घालू लागला. रोपाच्या बुंध्याभोवती पाणी साचेपर्यंत ओतत राहायचे, असे त्याला सांगितले होते. म्हणून त्याने बादलीमागून बादली ओतली. पण काही उपयोग झाला नाही. पाणी जमिनीला लागताच तहानलेली जमीन ते शोषून घेई. पाणी उपसून उपसून तो थकून गेला. दिवस कलल्यावर तो जमिनीवर आडवा झाला आणि झोपी गेला. धाकट्याचेही काही बरे झाले नाही. त्याची गाय सगळ्या मुलखात सर्वांत मारकी होती. तो तिला गावाबाहेर चरायला घेऊन गेला. तिथे ती शेपूट वर करून दूरवर उधळली. एका भातखाचरातून दुसऱ्यात शिरली. भात खाल्ला, तुडवला. उसाच्या मळ्यात घुसून गोड ऊस नासवला. या सगळ्यासाठी शेतमालकांनी गुराख्याची चांगलीच खरडपट्टी काढली.
दोन चोर
दिवस कसा गेला?
दिवसभर तो गायीमागे धावत राहिला. या शेतातून त्या शेतात, या डबक्यापासून त्या डबक्यापर्यंत. शेतमालकांनी त्याला शिव्या घातल्या. फक्त त्यालाच नाही, तर त्याच्या चौदा पिढ्यांचा उद्धार केला. फार वाईट दिवस गेला. खूप खटपट केल्यावर सूर्य मावळताना त्याने गाय पकडली आणि मालकाच्या घरी आणली. थोरला चोर नुकताच जागा झाला होता. तेवढ्यात धाकटा गाय घेऊन येताना त्याला दिसला. “भावा, रानातून यायला इतका उशीर का झाला?” त्याने विचारले. धाकट्याने त्याला खरे सांगितले नाही. “काय सांगू, दादा? कुरणात एक तळे आहे. त्याच्या काठी एक मोठे झाड आहे. तिथे मी गाय नेली आणि मोकळी सोडली. ती मुळीच त्रास न देता चरत राहिली. मी झाडाखाली गवतावर माझा पंचा पसरला. इतकी छान वाऱ्याची झुळूक होती, की मला लगेच झोप लागली. सूर्य मावळल्यावरच जाग आली. उठून पाहतो, तो माझी गुणी गाय चार पावलांवर मजेत चरते आहे. पण दादा, तुझा दिवस कसा गेला?” थोरल्यानेही खरे सांगितले नाही. “अरे, माझी तर चैन झाली,” तो म्हणाला. “एकच बादली ओतली, आणि रोपाभोवती पाण्याचे मोठे थारोळे साचले. माझे काम संपले. सगळा दिवस मोकळा. मी जमिनीवर पडून या नव्या आयुष्यातल्या सुखाचा विचार करत राहिलो. शीळ घातली, गाणी म्हटली, आणि शेवटी झोपी गेलो. आत्ताच उठलो आहे.”
दोन चोर
कामांची अदलाबदल
प्रत्येकाने दुसऱ्याचे म्हणणे खरे मानले. थोरल्याला वाटले, रोपाला पाणी घालण्यापेक्षा गाय राखणे सोपे. धाकट्याला वाटले, गाय राखण्यापेक्षा रोपाला पाणी घालणे सोपे. दोघांनीही कामांची अदलाबदल करायचे ठरवले. “भावा,” थोरला म्हणाला, “मला गाय राखावीशी वाटते. उद्या तू माझे काम कर, मी तुझे करतो. चालेल ना?” “अगदी चालेल, दादा,” धाकटा म्हणाला. “तुझे काम मी आनंदाने घेतो. आणि माझे तू खुशाल घे. फक्त एक सल्ला देतो. उघड्या जमिनीवर दिवसभर झोपणे मला जरा त्रासाचे गेले. सोबत एक खाट घेऊन गेलास, तर तुझी अगदी मजा होईल.” दुसऱ्या दिवशी पहाटे थोरला चोर गाय घेऊन रानात गेला. खाट न्यायला तो विसरला नाही. धाकटा रोपाला पाणी घालू लागला. एक बादली, फार तर दोन बादल्या पुरतील, असे त्याला वाटले होते. पण नवल! शंभर बादल्या ओतल्या, तरी रोपाच्या मुळांभोवतीची जमीन भिजली नाही. पाणी उपसून तो पार दमून गेला. सूर्य मावळायला आला, तरी काम संपेना. शेवटी अगदी थकून त्याने ते सोडून दिले.
दोन चोर
डोक्यावर खाट
रानात थोरल्याचेही काही बरे चालले नव्हते. धाकट्याने सांगितलेल्या जागी, मोठ्या झाडाशेजारच्या तळ्यापाशी, तो गाय घेऊन गेला. झाडाखाली त्याने खाट टाकली आणि गाय मोकळी सोडली. सोडताक्षणी गाय कुरणभर उधळली. कुंपणे आणि चर उड्या मारून ओलांडले. भातखाचरांतून धावली. उसाचे मळे नासवले. थोरला चोर चांगलाच वैतागला. दिवसभर त्याला धावाधाव करावी लागली. आणि ज्यांच्या शेतांत गाय घुसली, त्यांची बोलणी खावी लागली. पण सगळ्यात कहर म्हणजे, त्याला डोक्यावर खाट घेऊन कुरणभर धावावे लागले. ती कुठे खाली ठेवायची सोय नव्हती. ठेवली, तर कोणी घेऊन जाईल, अशी भीती. कुरणातल्या इतर गुराख्यांनी त्याला पाहिले. धापा टाकत, डोक्यावर खाट घेऊन तो गायीमागे धावत होता. त्यांनी टाळ्या वाजवून त्याची टर उडवली. तो भुकेला होता, चिडला होता. अदलाबदल केली, म्हणून त्याला मनापासून पस्तावा झाला. खूप खटपट केल्यावर, इतर गुराख्यांच्या मदतीने, अखेर त्याने गाय पकडली. गावात दिवे लागून बराच वेळ झाला, तेव्हा तो गाय घेऊन घरी पोहोचला. मालकाच्या घरी दोघे चोर भेटले. ते एकमेकांकडे पाहून फक्त हसले. एक शब्दही बोलले नाहीत. जेवण झाल्यावर ते झोपायला आडवे झाले आणि गप्पा सुरू झाल्या. “काय दादा, दिवस कसा गेला?” धाकट्याने विचारले. “तुझा गेला तसाच,” थोरला म्हणाला. “कदाचित थोडा जास्तच बरा.”
दोन चोर
रोपाखाली काय आहे?
“मला वाटते, लोक ज्याला प्रामाणिक कष्ट म्हणतात, त्यापेक्षा आपला जुना चोरीचा धंदा कितीतरी बरा,” धाकटा म्हणाला. “त्यात काय शंका?” थोरला म्हणाला. “पण देवाशपथ, असली गाय मी आयुष्यात पाहिली नाही. इतकी मारकी गाय सगळ्या जगात दुसरी नसेल.” “मारकी गाय काही दुर्मीळ नाही,” धाकटा म्हणाला. “तितक्याच वाईट गायी मी पाहिल्या आहेत. पण तुला पाणी घालायला सांगितले होते, तसले चाफ्याचे रोप तू कधी पाहिले आहेस का? एवढे सगळे पाणी जाते कुठे, कोण जाणे. त्याच्या मुळांखाली तळे तर नाही ना?” “त्याच्याभोवती खणून खाली काय आहे ते पाहावे, असे माझ्या फार मनात आहे,” थोरला म्हणाला. “आज रात्रीच खणू,” धाकटा म्हणाला, “मालक आणि मालकीण झोपले की.” मध्यरात्रीच्या सुमारास दोघे चोर कुदळ-फावडी घेऊन रोपाभोवती खणू लागले. बरेच खणल्यावर धाकट्याचे फावडे कशावर तरी खण्णकन आपटले. दोघांचीही उत्सुकता जागी झाली. धाकट्याने पाहिले, तर तो एक मोठा घडा होता. त्याने आत हात घातला. घडा सोन्याच्या मोहरांनी भरलेला होता. पण तो थोरल्याला म्हणाला, “अरे, काही नाही. मोठा दगड आहे.” थोरल्याला शंका आली, की हे काहीतरी वेगळे आहे. पण ती त्याने तोंडावाटे बाहेर पडू दिली नाही. काहीच सापडले नाही, तेव्हा आता खणणे थांबवू, असे दोघांनी ठरवले, आणि ते झोपी गेले.
दोन चोर
सोन्याचे दोन घडे
तासा-दोन तासांनी धाकटा झोपला आहे, असे थोरल्याने पाहिले. तो हळूच उठला आणि खड्ड्यापाशी गेला. मोहरांनी भरलेला घडा त्याला दिसला. शेजारी थोडे खणल्यावर आणखी एक घडा सापडला. तोही मोहरांनी भरलेला. तो आनंदाने हुरळून गेला. हा खजिना एकट्यानेच ठेवायचा, असे त्याने ठरवले. रोपासाठी ज्या तळ्यातून पाणी आणत, त्या जवळच्या तळ्यावर त्याने दोन्ही घडे नेले. आणि काठावरच्या चिखलात पुरले. मग परत येऊन तो गाढ झोपलेल्या धाकट्याशेजारी हळूच आडवा झाला. आता पहिला घडा शोधणारा धाकटा जागा झाला. अंथरुणातून हळूच उठून तो पाहिलेला खजिना आणायला गेला. पण घडा तिथे नव्हता. थोरल्यानेच तो कुठेतरी लपवला असणार, हे त्याने ओळखले. तो झोपलेल्या साथीदाराकडे परत आला. त्याच्या अंगावर एखादी खूण दिसते का, म्हणजे खजिना कुठे आहे ते कळेल, हे पाहायला. त्याने त्याला नीट न्याहाळले. थोरल्याच्या पायांना, घोट्यांभोवती चिखल लागला होता. खजिना तळ्यावरच कुठेतरी पुरला आहे, हे त्याने लगेच ओळखले. पण तळ्यावर कुठे? कोणत्या काठावर? धाकटा गोंधळला नाही. तो चारही काठांवरून फिरला. तीन काठांवरून चालताना बेडूक पाण्यात उड्या मारत होते. पण चौथ्या काठावरून एकही बेडूक उडी मारेना. म्हणजे खजिना इथेच पुरला आहे, असे त्याने ठरवले. आणि थोड्याच वेळात मोहरांचे दोन्ही घडे त्याला सापडले. ते बाहेर काढून तो गोठ्यात गेला. आधी स्वतः राखलेली मारकी गाय त्याने बाहेर काढली, दोन्ही घडे तिच्या पाठीवर लादले, आणि तो स्वतःच्या गावाकडे निघाला.
दोन चोर
जरीचे जोडे
कावळे कावकाव करू लागले, तेव्हा पहाटे थोरला जागा झाला. साथीदार शेजारी नाही, हे पाहून त्याला नवल वाटले. तो घाईघाईने तळ्यावर गेला. घडे गायब होते. तो गोठ्यात गेला. मारकी गायही गायब होती. धाकटाच खजिना गायीच्या पाठीवर लादून पळाला असणार, हे त्याने लगेच ताडले. आणि तो जाणार कुठे? आपल्या गावीच, दुसरीकडे कुठे? हा हिशेब लागताच तो त्याला गाठायला निघाला. शहरातून जाताना त्याने जवळचे सगळे पैसे खर्चून सोन्याच्या जरीने मढवलेले जोडे विकत घेतले. ते फार महाग होते. मुख्य रस्ता टाळून, आडवाटांनी तो झपाझप चालला. अखेर धाकटा त्याला दिसला. तो गायीला घेऊन रमतगमत चालला होता. थोरला त्याच्या सुमारे दोनशे यार्ड पुढे गेला आणि रस्त्यावर एक जोडा टाकला. आणखी दोनशे यार्ड पुढे जाऊन एका मोठ्या झाडाजवळ दुसरा जोडा टाकला. मग तो त्या झाडाच्या दाट पानांत लपून बसला. धाकटा रस्त्याने आला. त्याला पहिला जोडा दिसला. “काय सुंदर जोडा आहे!” तो मनाशी म्हणाला. “सोन्याची जर! आता मी श्रीमंत झालो आहे. मला तो शोभेल. पण एकटा जोडा काय कामाचा?” म्हणून तो पुढे चालला. थोड्याच वेळात दुसरा जोडा पडला होता तिथे तो आला. “अरे, हा तर दुसरा!” तो म्हणाला. “पहिला उचलला नाही, केवढा मूर्ख मी! असो, अजून उशीर झालेला नाही. गाय त्या झाडाला बांधतो आणि परत जाऊन तो घेऊन येतो.” त्याने गाय झाडाला बांधली, दुसरा जोडा उचलला, आणि सुमारे दोनशे यार्ड मागे पहिला आणायला गेला.
दोन चोर
एक मोहोर जास्त
इकडे थोरला झाडावरून उतरला. त्याने गाय सोडली आणि राजमार्ग टाळून तिला स्वतःच्या गावाकडे हाकलले. धाकटा झाडापाशी परत आला, तेव्हा गाय नव्हती. हे थोरल्याशिवाय दुसऱ्या कोणाचे काम नाही, हे त्याने लगेच ओळखले. तो जमेल तितक्या झपाट्याने चालला. आणि थोरला गाय घेऊन पोहोचायच्या कितीतरी आधी गावात पोहोचला. मग तो थोरल्याच्या घराच्या दाराजवळ लपून बसला. थोरला गाय घेऊन आला, आणि त्याच क्षणी धाकटा पुढे आला. “आलास का सुखरूप, दादा?” तो म्हणाला. “चल, आत जाऊन पैशांची वाटणी करू.” थोरला लगेच तयार झाला. घराच्या आतल्या अंगणात त्यांनी गायीच्या पाठीवरचे दोन्ही घडे उतरवले. एका खोलीत जाऊन दाराला कडी लावली आणि सोन्याची वाटणी सुरू केली. एका वेळी दोन मोहरा उचलायच्या. एक इकडे ठेवायची, एक तिकडे. घडे रिकामे होईपर्यंत ते असेच करत राहिले. पण अगदी शेवटी एक मोहोर उरली. ती घ्यायची कोणी? उद्या सकाळी ती मोहोर मोडून चांदीचे पैसे आणायचे आणि ते निम्मे निम्मे वाटायचे, असे त्यांनी ठरवले. पण तोपर्यंत ती एक मोहोर ठेवायची कोणी? त्यावरून बराच वेळ वाद झाला. एक हो म्हणे, दुसरा नाही. शेवटी मोहोर थोरल्याने ठेवायची, आणि सकाळी ती मोडून निम्मे निम्मे वाटायचे, असे ठरले.
दोन चोर
अंगणातला मुडदा
त्या रात्री थोरल्याने बायकोला आणि घरातल्या इतर बायकांना बोलावले. “ऐका गं. उद्या सकाळी धाकटा शेवटच्या मोहोरेतला त्याचा वाटा मागायला येईल. पण मी तो त्याला देणार नाही. म्हणून उद्या तुम्ही एक काम करायचे. अंगणात जमिनीवर एक कापड अंथरा. मी त्यावर मेल्याचे सोंग घेऊन पडतो. लोकांना मी मेलो आहे असे खरे वाटावे, म्हणून माझ्या डोक्याशी तुळस ठेवा. आणि धाकटा दारापाशी येताना दिसला, की मोठ्याने रडारड आणि आक्रोश सुरू करा. मग तो निघून जाईलच. आणि मला मोहोरेतला त्याचा वाटा द्यावा लागणार नाही.” बायका लगेच तयार झाल्या. दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास थोरला चोर अंगणात मुडद्यासारखा पडला. त्याच्या डोक्याशी तुळस होती. धाकटा घराजवळ येताना दिसताच बायका मोठमोठ्याने रडू लागल्या. हा काय प्रकार आहे, असा विचार करत तो जवळ जवळ येऊ लागला. तशा त्या ओरडल्या, “अरे, कुठे गेला होतात तुम्ही दोघे? काय घेऊन आलात? काय केलेत त्याचे? बघ, गेला तो!” आणि त्यांनी रडून आकाश दणाणून सोडले. धाकट्याने सगळे कपट ओळखले. “माझा मित्र, माझा भाऊ गेला, याचे मला वाईट वाटते,” तो म्हणाला. “आता त्याचे अंत्यसंस्कार मलाच केले पाहिजेत. तुम्ही सगळ्या इथून जा. तुम्ही बायका माणसे. त्याचे शव मी रीतसर जाळतो.”
दोन चोर
झाडाला टांगलेला
त्याने पेंढ्याचा ढीग आणला आणि त्याची दोरी वळली. ती मुडद्याच्या पायांना बांधली आणि त्याला ओढत नेऊ लागला. स्मशानात नेतो आहे, असे तो सांगत होता. रस्त्यांवरून फरफटत जाताना थोरल्याचे अंग चांगलेच खरचटले, ठेचाळले. पण तो चकार शब्द बोलला नाही. शेवटपर्यंत सोंग वठवायचे, आणि मित्राचा मोहोरेतला वाटा द्यायचा टाळायचा, असे त्याने ठरवले होते. धाकटा शव घेऊन स्मशानात पोहोचला, तेव्हा सूर्य मावळला होता. पण चिता रचायला लागल्यावर त्याला आठवले, आपण विस्तव आणलाच नाही. विस्तव आणायला गेलो आणि थोरल्याला इथे सोडले, तर तो नक्की पळून जाईल. आता करावे काय? शेवटी त्याने पेंढ्याची दोरी एका झाडाच्या फांदीला बांधली. सोंग घेतलेला मुडदा अधांतरी लोंबकळू लागला. मग धाकटा स्वतः झाडावर चढून त्याच फांदीवर बसला. दोरी तुटली आणि थोरला निसटला, तर? म्हणून त्याने दोरी घट्ट धरून ठेवली. ते असे असताना तिथून दरोडेखोरांची एक टोळी चालली होती. त्यांच्या म्होरक्याला ते टांगलेले शव दिसले. “आपल्या या दरोड्याची सुरुवात फार शुभ झाली,” तो म्हणाला. “ब्राह्मण आणि विद्वान पंडित सांगतात, प्रवासाला निघताना मुडदा दिसला, तर तो शुभशकुन असतो. आपल्याला तो दिसला आहे. म्हणजे आज रात्री आपल्याला चांगले यश मिळणार. मिळाले, तर माझे म्हणणे असे: परत येताना आधी या शवाला अग्नी देऊ, आणि मग घरी जाऊ.” सगळे दरोडेखोर कबूल झाले.
दोन चोर
पुन्हा स्मशानात
मग दरोडेखोरांनी गावातल्या एका श्रीमंताच्या घरावर दरोडा घातला. घरातल्या माणसांना मारून त्यांनी सगळा ऐवज लुटला. आणि हे सगळे त्यांनी इतक्या सफाईने केले, की गावात चिटपाखरालाही चाहूल लागली नाही. आशेपेक्षाही जास्त घबाड हाती लागले होते. म्हणून परत येताना पाहिलेल्या शवाला अग्नी द्यायचे त्यांनी ठरवले. ते स्मशानात पोहोचले, तेव्हा शव आधीसारखेच लोंबकळत होते. मोहोरेतला निम्मा वाटा द्यावा लागेल, या भीतीने थोरल्याने अजूनही तोंड उघडले नव्हते. दरोडेखोरांनी जमिनीत एक खळगा खणला. लाकडे आणून त्या खळग्यावर रचली. शव झाडावरून उतरवून चितेवर ठेवले. ते अग्नी देणार, इतक्यात मुडद्याने एक भयंकर किंकाळी फोडली आणि तो ताडकन उठून उभा राहिला. नेमक्या त्याच क्षणी धाकटाही तशीच किंकाळी फोडून झाडावरून खाली उडी मारून आला. दरोडेखोरांची भीतीने गाळण उडाली. मुडद्यात कोणीतरी पिशाच शिरले आहे, आणि झाडावरून भूत उडी मारून आले आहे, असे त्यांना वाटले. लुटलेले पैसे आणि दागिने तिथेच टाकून ते जीव घेऊन पळाले. दोघे चोर पोट धरधरून हसले. दरोडेखोरांचे सगळे धन उचलून ते घरी गेले, आणि पुढे बराच काळ मजेत राहिले. ही गोष्ट लालबिहारी डे यांना बंगाली भाषेत सांगितली गेली. त्यांनी ती इंग्रजीत आणली आणि १८८३ मध्ये बंगालच्या लोककथांच्या पुस्तकात छापली. डे यांची गोष्ट पुढे या दोन चोरांच्या मुलांच्या करामतींकडे वळते. तो भाग इथे सांगितलेला नाही.