बंगालच्या लोककथा
कुपीतले भूत
भूत घरी येते
एक गरीब ब्राह्मण होता. त्याचे लग्न जमणे फार कठीण होते. कारण त्यासाठी मोठी रक्कम लागणार होती. ती लग्नाच्या खर्चासाठी नव्हे, तर मुख्यतः वधूच्या आई-वडिलांना द्यायला. म्हणून तो श्रीमंतांकडे गेला आणि लग्नासाठी पैसे मागू लागला. दारोदार फिरून, कितीतरी श्रीमंतांची हांजी हांजी करून शेवटी त्याने हवी तेवढी रक्कम जमवली. यथावकाश लग्न झाले, आणि तो बायकोला घेऊन आईकडे घरी आला. थोड्या दिवसांनी तो आईला म्हणाला, “आई, तुला आणि माझ्या बायकोला पोसायला माझ्याकडे काहीच साधन नाही. म्हणून मला दूरदेशी जाऊन कसेही करून पैसे मिळवले पाहिजेत. कित्येक वर्षे लागतील, कारण चांगली रक्कम हाती आल्याशिवाय मी परत येणार नाही. तोपर्यंत माझ्याकडे आहे ते तुला देतो. त्यात कसेबसे भागव, आणि माझ्या बायकोला सांभाळ.” आईने त्याला आशीर्वाद दिला, आणि तो प्रवासाला निघाला. त्याच दिवशी संध्याकाळी एक भूत घरात शिरले. ते हुबेहूब ब्राह्मणासारखे दिसत होते. तरुण बायकोला वाटले, हा आपला नवराच. “इतक्या लवकर कसा परत आलास?” तिने विचारले. “कित्येक वर्षे बाहेर राहीन, असे म्हणाला होतास. मग विचार का बदललास?” “आजचा दिवस शुभ नाही,” भूत म्हणाले, “म्हणून घरी परत आलो. शिवाय थोडे पैसे मिळालेच आहेत.” हा आपलाच मुलगा, याबद्दल आईला जराही शंका आली नाही. म्हणून ते भूत घराचा मालक असल्यासारखे घरात राहू लागले. जणू तेच म्हातारीचा मुलगा आणि तरुणीचा नवरा. भूत आणि ब्राह्मण सगळ्याच बाबतीत हुबेहूब सारखे होते. त्यामुळे सगळे शेजारीही भुतालाच खरा ब्राह्मण समजू लागले.
कुपीतले भूत
उद्या या
काही वर्षांनी ब्राह्मण प्रवासाहून परत आला. घरात आपल्यासारखाच दुसरा एक माणूस पाहून त्याला किती आश्चर्य वाटले असेल! “कोण तू?” भुताने विचारले. “माझ्या घरात तुझे काय काम?” “मी कोण?” ब्राह्मण म्हणाला. “तू कोण, ते मी विचारतो. हे माझे घर आहे. ती माझी आई, आणि ही माझी बायको.” “हे तर विचित्रच!” भूत म्हणाले. “हे माझे घर, ती माझी बायको, ती माझी आई, हे सगळ्यांना माहीत आहे. मी इथे कित्येक वर्षे राहतो आहे. आणि तू म्हणतोस, हे तुझे घर, ती तुझी बायको. ब्राह्मणा, तुझे डोके फिरलेले दिसते.” असे म्हणून भुताने ब्राह्मणाला घराबाहेर हाकलून दिले. ब्राह्मण आश्चर्याने थक्क झाला. काय करावे, ते त्याला सुचेना. शेवटी राजाकडे जाऊन त्याच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडावे, असे त्याला सुचले. राजाने भूत-ब्राह्मणाकडे पाहिले आणि ब्राह्मणाकडे पाहिले. दोघे अगदी सारखे दिसत होते. त्यामुळे राजा पेचात पडला. हे भांडण कसे मिटवावे, ते त्याला कळेना. दिवसामागून दिवस ब्राह्मण राजाकडे जात राहिला. माझे घर, माझी बायको आणि माझी आई मला परत मिळवून द्या, अशी विनवणी करत राहिला. आणि दर वेळी राजाला काय बोलावे ते सुचत नसे, म्हणून तो त्याला दुसऱ्या दिवसावर ढकलत असे. “उद्या या,” राजा रोज सांगे. आणि ब्राह्मण रोज रडत, हाताच्या तळव्याने कपाळ बडवत राजवाड्यातून बाहेर पडे. “काय हे दुष्ट जग!” तो आक्रोश करी. “मला माझ्याच घरातून हाकलून दिले. आणि दुसऱ्याच कोणीतरी माझे घर आणि माझी बायको बळकावली! आणि हा कसला राजा! न्यायच करत नाही.”
कुपीतले भूत
गुराख्यांचा राजा
गावाबाहेरच्या दरबारातून परत येताना ब्राह्मण रोज एका जागेवरून जाई. तिथे पुष्कळ गुराखी पोरे खेळत असत. ते गायींना कुरणात चरायला सोडत आणि एका मोठ्या झाडाखाली जमून खेळत. त्यांचा खेळ होता राजा आणि दरबार. एक पोर राजा व्हायचा. दुसरा प्रधान, म्हणजे वजीर. आणखी एक कोतवाल. आणि बाकीचे शिपाई. कित्येक दिवस पोरांनी ब्राह्मणाला रडत जाताना पाहिले. एके दिवशी पोरराजाने वजिराला विचारले, “हा ब्राह्मण रोज का रडतो, ठाऊक आहे?” वजिराला सांगता आले नाही. म्हणून पोरराजाने एका शिपायाला ब्राह्मणाला घेऊन यायचा हुकूम दिला. शिपाई गेला आणि ब्राह्मणाला म्हणाला, “राजाने तुम्हाला आत्ताच्या आत्ता बोलावले आहे.” “कशाला?” ब्राह्मण म्हणाला. “मी आत्ताच राजाकडून आलो. त्याने मला उद्यावर ढकलले. आता पुन्हा कशाला बोलावतो?” “आमचा राजा बोलावतो आहे,” शिपाई म्हणाला. “आमचा गुराख्यांचा राजा, आम्हा गुराख्यांचा राजा.” “हा गुराख्यांचा राजा कोण?” ब्राह्मणाने विचारले. “चला, बघा,” पोरगा म्हणाला. “तुम्ही रोज रडत का जाता?” गुराख्यांच्या राजाने ब्राह्मणाला विचारले. ब्राह्मणाने त्याला आपली दुःखाची कहाणी सांगितली. सगळे ऐकून घेतल्यावर गुराख्यांचा राजा म्हणाला, “तुमचे गाऱ्हाणे मला कळले. तुमचे सगळे तुम्हाला परत मिळवून देतो. फक्त राजाकडे जा, आणि तुमचा खटला मला चालवू द्या म्हणून त्याची परवानगी घ्या.” ब्राह्मण पुन्हा देशाच्या राजाकडे गेला. गुराख्यांचा राजा माझा खटला चालवायला तयार आहे, तो खटला त्याच्याकडे सोपवा, अशी त्याने राजाला विनवणी केली. या खटल्याने राजा फार बुचकळ्यात पडला होता. त्याने परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनावणी ठरली.
कुपीतले भूत
अरुंद तोंडाची कुपी
गुराख्यांच्या राजाने सगळा प्रकार ओळखला होता. दुसऱ्या दिवशी त्याने बरोबर काचेची एक छोटी, अरुंद तोंडाची कुपी आणली. ब्राह्मण आणि भूत-ब्राह्मण दोघेही दरबारापुढे हजर झाले. साक्षीदारांची भरपूर उलटतपासणी झाली, भाषणे झाली. मग गुराख्यांचा राजा म्हणाला, “बस, आता पुरे ऐकले. मी लगेच निकाल देतो. ही बघा कुपी. तुमच्यापैकी जो हिच्यात शिरेल, तोच घराचा खरा मालक, असा हा दरबार निकाल देईल. बघू, आता कोण आत शिरतो.” “तू गुराखी,” ब्राह्मण म्हणाला, “आणि तुझी अक्कलही गुराख्याचीच! एवढ्याशा कुपीत कोणता माणूस शिरू शकेल?” “तुम्हाला शिरता येत नसेल,” गुराख्यांचा राजा म्हणाला, “तर तुम्ही खरे मालक नाही.” मग तो भूत-ब्राह्मणाकडे वळला. “आणि तुम्ही, महाराज? तुमचे काय म्हणणे? या कुपीत शिरलात, तर घर, बायको आणि आई तुमची.” “शिरणार तर! त्यात काय?” भूत म्हणाले. आणि ते खरोखर शिरले. सगळे थक्क होऊन पाहत असताना ते एखाद्या किड्याएवढे लहान झाले आणि कुपीत गेले. गुराख्यांच्या राजाने लगेच कुपीला बूच लावले. आता भुताला बाहेर पडता येईना. मग गुराख्यांचा राजा ब्राह्मणाला म्हणाला, “ही कुपी समुद्राच्या तळाशी फेकून द्या. आणि तुमचे घर, तुमची बायको आणि तुमची आई परत घ्या.” ब्राह्मणाने तसेच केले. तो पुष्कळ वर्षे सुखाने राहिला. त्याला मुलगे आणि मुली झाल्या. ही गोष्ट लालबिहारी डे यांना बंगाली भाषेत सांगितली गेली. त्यांनी ती इंग्रजीत आणली आणि १८८३ मध्ये बंगालच्या लोककथांच्या पुस्तकात छापली.