बंगालच्या लोककथा
लग्न जुळवणारा कोल्हा
विणकर आणि कोल्हा
एक विणकर होता. त्याचे पूर्वज फार श्रीमंत होते. पण त्याच्या बापाने वारशाने आलेले सगळे मौजमजेत उडवले. त्यामुळे राजवाड्यासारख्या घरात जन्मलेला हा विणकर आता एका मोडक्या झोपडीत राहत होता. आई-वडील, नातेवाईक सगळे वारले होते. जगात त्याचे कोणीच नव्हते. झोपडीजवळच एका कोल्ह्याचे बीळ होते. विणकराचे पूर्वज किती श्रीमंत, किती मोठे होते, हे कोल्ह्याला आठवत होते. त्याला विणकराची दया आली. एके दिवशी तो विणकराकडे आला आणि म्हणाला, “विणकरमित्रा, तुझे हाल मला दिसतात. तुझे दिवस पालटावेत असे माझ्या फार मनात आहे. या देशाच्या राजाच्या मुलीशी तुझे लग्न लावून द्यायचा मी प्रयत्न करतो.” “मी? राजाचा जावई?” विणकर म्हणाला. “सूर्य पश्चिमेला उगवेल, तेव्हा होईल ते!” “माझ्या ताकदीवर विश्वास नाही?” कोल्हा म्हणाला. “बघशीलच तू. मी हे घडवून आणतो.” दुसऱ्या दिवशी सकाळी कोल्हा राजाच्या नगराकडे निघाला. ते बरेच मैल दूर होते. वाटेत तो नागवेलीच्या एका मळ्यात शिरला आणि त्याने विड्याची भरपूर पाने तोडली. बंगालमध्ये लोक हौसेने विडा खातात. कोल्हा नगरात पोहोचला आणि कसाबसा राजवाड्यात शिरला. राजवाड्याच्या आवारात पायऱ्यांचे एक तळे होते. राजघराण्यातल्या स्त्रिया सकाळ-संध्याकाळ तिथे स्नान करत. तळ्याच्या प्रवेशापाशीच कोल्हा आडवा पडला.
लग्न जुळवणारा कोल्हा
विडा खाणारा कोल्हा
नेमकी त्याच वेळी राजकन्या दासींना घेऊन स्नानाला आली. तिथे कोल्हा पडलेला पाहून तिला नवल वाटले. त्याला हाकलून द्या, असे तिने दासींना सांगितले. कोल्हा झोपेतून जागा झाल्यासारखा उठला. पण पळून जायच्या ऐवजी त्याने पानांचे गाठोडे सोडले. काही पाने तोंडात टाकली आणि तो ती चघळू लागला. राजकन्या आणि दासी थक्क झाल्या. “काय विलक्षण कोल्हा आहे!” त्या एकमेकींना म्हणाल्या. “हा आला तरी कुठून? कोल्हा विडा खातो! या नगरातल्या हजारो लोकांना विडा परवडत नाही. हा नक्की कुठल्यातरी श्रीमंत देशातून आला असणार.” “शिवालू,” राजकन्येने विचारले. तिथले लोक कोल्ह्याला शिवालू म्हणतात. “तू कुठून आलास? जिथे कोल्हेसुद्धा विडा खातात, तो देश फार संपन्न असला पाहिजे. तिथले बाकीचे प्राणीही विडा खातात का?” “प्रिय राजकन्ये,” कोल्हा म्हणाला, “मी समृद्धीच्या देशातून आलो आहे. तुमच्या शेतात जसे गवत, तशी आमच्याकडे विड्याची पाने. गायी, मेंढ्या, कुत्री, सगळे प्राणी विडा खातात. चांगल्या गोष्टींची आम्हाला कसलीच वाण नाही.” “धन्य तो देश, जिथे एवढी समृद्धी आहे!” राजकन्या म्हणाली. “आणि त्या देशाचा राजा तर त्रिवार धन्य!” “आमच्या राजाचे काय सांगू!” कोल्हा म्हणाला. “तो जगातला सर्वात श्रीमंत राजा आहे. त्याचा महाल इंद्राच्या स्वर्गासारखा आहे. इथला तुमचा महाल मी पाहिला. त्याच्या महालापुढे हा म्हणजे मोडकी झोपडी.”
लग्न जुळवणारा कोल्हा
राणीला उत्सुकता
आता राजकन्येची उत्सुकता शिगेला पोहोचली. तिने घाईघाईने स्नान उरकले. ती आई राणीकडे गेली आणि तळ्यापाशी भेटलेल्या अजब कोल्ह्याबद्दल तिने सांगितले. राणीलाही उत्सुकता वाटली. तिने कोल्ह्याला बोलावणे पाठवले. तो राणीपुढे उभा राहिला आणि विड्याची पाने चघळू लागला. “तू फार श्रीमंत देशातून आला आहेस,” राणी म्हणाली. “तुमच्या राजाचे लग्न झाले आहे का?” “नाही, राणीसाहेब,” कोल्हा म्हणाला. “जगाच्या दूरदूरच्या भागातल्या राजकन्यांनी त्याच्याशी लग्नाचा प्रयत्न केला. पण त्याने सगळ्यांना नकार दिला. आमचा राजा ज्या राजकन्येशी लग्न करायची कृपा करील, ती भाग्यवानच!” “शिवालू,” राणीने विचारले, “माझी मुलगी अप्सरेसारखी सुंदर आहे, असे तुला नाही वाटत? जगातल्या सर्वात गर्विष्ठ राजाची बायको व्हायला ती योग्य नाही का?” “राजकन्या फार सुंदर आहेत, असे मलाही वाटते,” तो म्हणाला. “खरे सांगायचे तर, इतकी सुंदर राजकन्या मी कधीच पाहिली नाही. पण आमच्या राजाला त्या पसंत पडतील की नाही, हे मी सांगू शकत नाही.” “माझी मुलगी पसंत पडेल का म्हणे!” राणी म्हणाली. “ती जशी आहे तशी तू त्याला फक्त वर्णन करून सांग. तो तिच्यासाठी वेडा होईल. पण थट्टा पुरे, शिवालू. माझ्या मुलीचे लग्न व्हावे असे मला वाटते. कितीतरी राजपुत्रांनी तिला मागणी घातली. पण मी तिला त्यांच्यापैकी कोणालाच देणार नाही. कारण ते मोठ्या राजांचे पुत्र नाहीत. तुमचा राजा मात्र मोठा राजा दिसतो. त्याला जावई करायला माझी काही हरकत नाही.” राणीने राजाला निरोप पाठवला आणि कोल्ह्याला येऊन भेटायला सांगितले. राजा आला. कोल्ह्याने त्याच्या देशाच्या राजाची संपत्ती आणि वैभव वर्णन करून सांगितले. ते ऐकून राजा म्हणाला, “त्याला मुलगी द्यायला माझी काही ना नाही.”
लग्न जुळवणारा कोल्हा
मागराज
यानंतर कोल्हा विणकराकडे परत आला. “हे मागराज,” तो म्हणाला, “तुझ्याइतका भाग्यवान जगात कोणी नाही. सगळे ठरले. तू एका मोठ्या राजाचा जावई होणार आहेस. तूसुद्धा मोठा राजा आहेस, असे मी त्यांना सांगितले आहे. म्हणून तुला राजासारखेच वागले पाहिजे. मी सांगेन तसेच तू करायचेस. नाहीतर तुझे नशीब उघडणार नाही, आणि ते आपल्या दोघांनाही ठार मारतील.” “तू म्हणशील तसेच करीन,” विणकर म्हणाला. चतुर कोल्ह्याने मनाशी एक बेत आखला. काही दिवसांनी तो पूर्वीसारखाच विड्याची पाने चघळत राजवाड्यात गेला. तळ्याच्या प्रवेशापाशी आडवा पडला. त्याला पाहून राजा-राणीला आनंद झाला. कामगिरीचे काय झाले, असे त्यांनी उत्सुकतेने विचारले. “आपल्या मनाला दिलासा मिळावा म्हणून आधीच सांगतो,” कोल्हा म्हणाला, “आतापर्यंत सगळे छान झाले आहे. माझ्या धन्याला आपल्या मुलीशी लग्नाला तयार करताना मला अपार खटपट करावी लागली. ती आपल्याला कळली असती, तर आपण माझे आभार मानता मानता थकला नसतात. बराच काळ ते ऐकूनच घेत नव्हते. पण हळूहळू मी त्यांचे मन वळवले. आता आपण लग्नाचा फक्त शुभ दिवस ठरवा. “पण एक मित्र म्हणून आपल्याला एक सल्ला देतो. माझे धनी फार मोठे राजे आहेत. ते सगळा लवाजमा, घोडे, हत्ती घेऊन थाटात आले, तर आपल्या महालात काय, या नगरातही त्या सगळ्यांना जागा पुरणार नाही. म्हणून ते थाटात न येता साधेपणाने यावेत, असे मला वाटते. आपले हत्ती, घोडे आणि गाड्या नगराच्या वेशीपाशी पाठवा. त्यांना आणि त्यांच्या मोजक्या माणसांना त्यातून महालात आणा.” “सल्ल्याबद्दल फार आभारी आहे, शहाण्या शिवालू,” राजा म्हणाला. “इतक्या मोठ्या राजाच्या लवाजम्याला माझ्या नगरात जागा पुरणारच नाही. ते थाटात आले नाहीत तर मला फार बरे वाटेल. तुझे वजन खर्च कर आणि त्यांना साधेपणाने यायला राजी कर. ते थाटात आले, तर माझे दिवाळेच निघेल.” “मी शक्य ते सगळे करीन,” कोल्हा गंभीरपणे म्हणाला. राजज्योतिषांनी लग्नाचा शुभ दिवस काढला, आणि कोल्हा आपल्या गावी परत गेला.
लग्न जुळवणारा कोल्हा
हजार कोल्हे
घरी आल्यावर कोल्हा मोठ्या दिवसाच्या तयारीला लागला. विणकराच्या अंगावर फाटक्या चिंध्या होत्या. म्हणून कोल्ह्याने त्याला गावातल्या धोब्यांकडे जाऊन एक कपड्यांचा जोड उसना आणायला सांगितले. कोल्हा स्वतः कोल्ह्यांच्या राजाकडे गेला. अमुक दिवशी, अमुक ठिकाणी, माझ्याबरोबर हजार कोल्हे पाठवा, अशी त्याने विनंती केली. मग तो कावळ्यांच्या राजाकडे गेला. त्याच दिवसासाठी त्याच्या हजार काळ्या प्रजाजनांची त्याने अगदी नम्रपणे मागणी केली. भातखाचरातल्या बगळ्यांच्या राजाकडेही त्याने तीच विनंती केली. अखेर तो मोठा दिवस उजाडला. विणकराने धोब्यांकडून उसने आणलेले कपडे घातले. कोल्हा आला. त्याच्यामागे हजार कोल्हे, हजार कावळे आणि हजार बगळे होते. वरात निघाली. सूर्य मावळायच्या सुमारास ती राजवाड्यापासून दोन मैलांवर येऊन पोहोचली. तिथे कोल्ह्याने हजार कोल्ह्यांना शक्य तितक्या मोठ्याने कोल्हेकुई करायला सांगितले. त्याचा शब्द होताच हजार कावळे जिवाच्या आकांताने काव काव करू लागले. हजार बगळ्यांनीही कर्कश्श किंचाळ्या फोडल्या. सगळ्यांचा मिळून असा गलका झाला, की जग निर्माण झाल्यापासून असा आवाज कोणी ऐकला नसेल. हा गोंगाट चालू असतानाच कोल्हा घाईने राजवाड्यात गेला. वऱ्हाडाची सोय आपल्याला करता येईल का, असे त्याने राजाला विचारले. वऱ्हाड इथून दोन मैलांवर आहे, तो म्हणाला. त्याचाच आवाज आत्ता आपल्या कानांवर येतो आहे. “अशक्य, शिवालू!” राजा म्हणाला. “आवाजावरून तर किमान लाखभर माणसे असावीत. एवढ्या पाहुण्यांची सोय मी कशी करू? कृपा करून नवरदेवाला एकट्यानेच माझ्या घरी यायला सांग.” “ठीक आहे,” कोल्हा म्हणाला. “माझ्या धन्याच्या सगळ्या लवाजम्याला आपल्याकडे जागा पुरणार नाही, हे मी सुरुवातीलाच सांगितले होते. आपल्या इच्छेप्रमाणे करतो. माझे धनी साध्या कपड्यांत एकटेच येतील. त्यांच्यासाठी एक घोडा पाठवा.”
लग्न जुळवणारा कोल्हा
वासे मोजणारा नवरदेव
कोल्हा एक घोडा आणि एक मोतद्दार घेऊन विणकर थांबला होता तिथे परत गेला. हजार कोल्हे, हजार कावळे आणि हजार बगळे यांचे त्याने मदतीबद्दल आभार मानले आणि सगळ्यांना निरोप दिला. मग दोघे राजवाड्याकडे निघाले. विणकर घोड्यावर बसला होता. तिथे वाट पाहणाऱ्या वधूपक्षाची नवरदेवाचे रूप पाहून फार निराशा झाली. पण कोल्ह्याने त्यांना सांगितले, “माझ्या धन्याने मुद्दाम साधे कपडे घातले आहेत. ते थाटात लवाजम्यासह आले तर जागा पुरणार नाही, असे त्यांचे होणारे सासरेच म्हणाले होते.” राजपुरोहितांनी विधी सुरू केले, आणि लग्नाची गाठ कायमची पडली. सगळ्या विधींमध्ये नवरदेवाने तोंड जवळजवळ उघडलेच नाही. बोलण्यावरून बिंग फुटेल, म्हणून कोल्ह्याने त्याला गप्प राहायला सांगितले होते. त्या रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या विणकर खोलीचे तुळया-वासे मोजू लागला. विणकराच्या मागाला कापड गुंडाळायचा एक लाकडी रूळ असतो. धागे घट्ट बसवणारी एक फणीही असते. “या तुळईचा झकास माग होईल,” तो मोठ्याने म्हणाला. “त्या वाशाचा छान रूळ होईल. आणि तो तिकडचा वासा, त्याची तर उत्तम फणी होईल.” नवरी थक्क झाली. ‘ज्याच्याशी माझी गाठ बांधली, तो राजा आहे की विणकर?’ तिच्या मनात आले. ‘मला भीती वाटते, हा विणकरच असावा. नाहीतर माग, रूळ आणि फण्यांच्या गोष्टी का करील? अरेरे, हेच का माझ्या नशिबी होते?’ सकाळी राजकन्येने नवरा काय म्हणाला ते आईला सांगितले. राजा-राणीला फार आश्चर्य वाटले. त्यांनी कोल्ह्याला जाब विचारला. चलाख कोल्ह्याने लगेच उत्तर दिले. “माझ्या धन्याच्या बोलण्याचे आपण नवल करायचे कारण नाही. त्यांच्या महालाभोवती जगातल्या उत्तम विणकरांची सातशे कुटुंबे राहतात. त्यांना त्यांनी खंड न घेता जमीन दिली आहे. त्या विणकरांचे भले व्हावे, असे त्यांना नेहमी वाटते. कधीतरी प्रेमळ भावनेत ते असे बोलून गेले असतील.”
लग्न जुळवणारा कोल्हा
नवऱ्याचा महाल
तरीही आता विणकराला घेऊन राजकन्येसह सटकायची हीच वेळ आहे, असे कोल्ह्याला वाटले. विणकर कधीही बिंग फोडील, अशी भीती होती. म्हणून त्याने राजाला सांगितले, “राज्याच्या महत्त्वाच्या कामांमुळे माझ्या धन्याला आणखी एक दिवसही इथे थांबता येणार नाही. आजच त्यांना नवरीला घेऊन आपल्या राज्याकडे निघायला हवे.” त्याचे धनी कोणाला न कळता पायी जाणार होते. फक्त राजकन्या, आता राणी, पालखीतून नगराबाहेर जाणार होती. बरीच हो-ना झाली. पण शेवटी राजा-राणी तयार झाले. विणकराच्या गावाच्या वेशीपाशी आल्यावर पालखीच्या भोयांना परत पाठवले. माझ्या नवऱ्याचा महाल कुठे आहे, असे राजकन्येने विचारले. तिला पायी चालावे लागले. लवकरच ते विणकराच्या झोपडीपाशी आले. “बाईसाहेब,” कोल्हा म्हणाला, “हाच आपल्या नवऱ्याचा महाल.” राजकन्येने हताश होऊन कपाळावर तळहात मारून घेतले. “लग्नगाठी बांधणाऱ्या प्रजापतींनी माझ्यासाठी हाच नवरा ठेवला होता का?” ती कळवळून म्हणाली. “यापेक्षा मरण हजारपटीने बरे!” पण आता काहीच करता येण्यासारखे नव्हते. लवकरच राजकन्येने आपल्या नशिबाशी जुळवून घेतले. नवऱ्याला श्रीमंत करायचे, असे तिने ठरवले. श्रीमंत होण्याचे गुपित तिला ठाऊक होते, म्हणून तर तिचा निश्चय आणखी पक्का झाला.
लग्न जुळवणारा कोल्हा
पिठाचे सोने
एके दिवशी तिने नवऱ्याला एका पैशाचे पीठ आणायला सांगितले. तिने पिठात थोडे पाणी घालून ते भिजवले. तो लेप तिने अंगभर लावला. तो सुकल्यावर बोटांनी चोळून काढला. अंगावरून त्याचे बारीक कण गळू लागले आणि त्यांचे सोने झाले. काही दिवस तिने रोज असे केले आणि सोन्याची मोठी रास जमवली. लवकरच तिच्याजवळ कोणत्याही राजाच्या खजिन्यात नसेल इतके सोने जमले. या सोन्यातून तिने गवंडी, सुतार आणि बांधकाम करणाऱ्यांची एक मोठी फौजच कामाला लावली. त्यांनी फार लवकर जगातल्या सर्वात सुंदर महालांपैकी एक महाल बांधला. विणकरांची सातशे कुटुंबे शोधून आणली आणि त्यांना महालाभोवती वसवले. मग तिने वडिलांना पत्र लिहिले. “लग्नाच्या दिवसानंतर आपण मला भेटायला आला नाहीत, याचे मला वाईट वाटते. आता आपण येऊन मला आणि माझ्या नवऱ्याला भेटलात, तर मला फार आनंद होईल.” राजा यायला तयार झाला, आणि दिवस ठरला. वडिलांच्या भेटीसाठी राजकन्येने जय्यत तयारी केली. नगरात जागोजागी आजारी, रोगी आणि अशक्त जनावरांसाठी दवाखाने उघडले. रस्त्याच्या कडेने हजारो जनावरांना विडा चघळायला लावले. राजा आणि त्याच्या लवाजम्याला चालायला रस्त्यांवर काश्मिरी शाली अंथरल्या. संपत्तीच्या आणि वैभवाच्या प्रदर्शनाला अंतच नव्हता. राजा आणि राणी थाटामाटात आले. जावयाची अमाप संपत्ती पाहून त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही. तेव्हा कोल्हा पुढे आला. त्याने राजा-राणीला मुजरा केला आणि म्हणाला, “मी सांगितले होते ना?” ही गोष्ट लालबिहारी डे यांना बंगाली भाषेत सांगितली गेली. त्यांनी ती इंग्रजीत आणली आणि १८८३ मध्ये बंगालच्या लोककथांच्या पुस्तकात छापली. या संकेतस्थळावर याच प्रकारची एक काश्मिरी गोष्टही आहे: ‘हुशार कोल्हा’.