बंगालच्या लोककथा
न्हावी आणि भूत
न्हावी घर सोडतो
एक न्हावी होता. त्याला बायको होती. दोघांचे काही पटत नसे. पोटभर खायला मिळत नाही, अशी बायकोची सतत तक्रार असे. ती बिचाऱ्या न्हाव्याला वारंवार फैलावर घेई. “बायको पोसता येत नव्हती, तर माझ्याशी लग्न कशाला केलेस?” ती म्हणे. “ज्यांची ऐपत नाही, त्यांनी बायकोची हौस करू नये. माहेरी मला भरपूर खायला मिळायचे. इथे तुझ्या घरी आले, ती उपास करायलाच, असे दिसते. उपास करायचे विधवांनी. तुझ्या जिवंतपणीच मी विधवा झाले!” ती बोलण्यावरच थांबली नाही. एके दिवशी तिला फार राग आला, आणि तिने घरातल्या केरसुणीने नवऱ्याला मारले. न्हाव्याला शरम वाटली. बायकोचे टोमणे आणि हा मार, यामुळे त्याला स्वतःचीच घृणा वाटली. म्हणून त्याने घर सोडले. धंद्याची हत्यारे बरोबर घेतली: वस्तरे, सहाण, वस्तऱ्यांना धार लावायचा पट्टा, आणि एक छोटा आरसा. गिऱ्हाइकांना दाढी नीट झाली की नाही ते पाहता यावे, म्हणून तो आरसा नेहमी जवळ ठेवी. श्रीमंत झाल्याशिवाय परत येणार नाही, बायकोचे तोंड पाहणार नाही, अशी त्याने शपथ घेतली. तो गावोगाव फिरला. संध्याकाळ होता होता एका जंगलाच्या कडेला पोहोचला. एका झाडाच्या बुंध्याशी तो आडवा झाला. आणि आपल्या फुटक्या नशिबाला दोष देत कितीतरी तास दुःखात घालवले.
न्हावी आणि भूत
पिशवीत आणखी एक भूत
त्या झाडावर नेमके एक भूत राहत होते. झाडाखाली माणूस दिसल्यावर त्याला मारावे, असेच भुताच्या मनात आले. ते झाडावरून खाली उतरले. हात पसरून, तोंड वासून ते न्हाव्यापुढे ताडाच्या झाडासारखे उंच उभे राहिले. “काय रे न्हाव्या,” ते म्हणाले, “आता मी तुला मारणार. तुला कोण वाचवतो, बघू!” न्हावी भीतीने थरथर कापत होता. अंगावर काटा उभा राहिला होता. पण त्याने डोके ठिकाणावर ठेवले. “तू? मला मारणार?” तो म्हणाला. “जरा थांब. आज रात्रीच मी किती भुते पकडून पिशवीत भरली आहेत, ते तुला दाखवतो. तू इथे भेटलास, फार बरे झाले. आता माझ्या पिशवीत आणखी एक भूत येईल.” त्याने पिशवीतून तो छोटा आरसा काढला. तो उभा राहिला, आणि आरसा भुताच्या तोंडासमोर धरून म्हणाला, “हे बघ, हे एक भूत मी पकडून पिशवीत टाकले आहे. त्याला सोबत म्हणून आता तुलाही पिशवीत टाकतो.” आरशात भुताला स्वतःचेच तोंड दिसले. न्हाव्याचा शब्दन् शब्द त्याला खरा वाटला, आणि त्याची भीतीने गाळण उडाली. “अहो न्हावीदादा,” ते म्हणाले, “तुम्ही सांगाल ते मी करीन. फक्त मला पिशवीत टाकू नका. तुम्हाला हवे ते मी देईन.”
न्हावी आणि भूत
हजार मोहरा
“तुम्ही भुते म्हणजे दगाबाज जात,” न्हावी म्हणाला. “तुमचा काही भरवसा नाही. कबूल कराल, आणि दिलेला शब्द पाळणार नाही.” “अहो, माझ्यावर दया करा,” भूत म्हणाले. “तुम्ही सांगाल ते मी आणून देईन. नाही आणले, तर खुशाल मला पिशवीत टाका.” “ठीक आहे,” न्हावी म्हणाला. “आत्ताच्या आत्ता मला हजार सोन्याच्या मोहरा आणून दे. आणि उद्या रात्रीपर्यंत माझ्या घरात एक कोठार बांधून ते साळीने भरून टाक. जा, आधी मोहरा घेऊन ये. मी सांगितले ते केले नाहीस, तर तू माझ्या पिशवीत जाणार, हे नक्की.” भूत आनंदाने कबूल झाले. ते गेले, आणि थोड्याच वेळात हजार मोहरांची थैली घेऊन परत आले. मोहरा पाहून न्हाव्याला अतिशय आनंद झाला. उद्या रात्रीपर्यंत माझ्या घरात भाताने भरलेले कोठार उभे राहिले पाहिजे, याची नीट काळजी घे, असे त्याने भुताला बजावले. पहाटेच्या प्रहरी त्या जड खजिन्याने वाकलेल्या न्हाव्याने स्वतःच्या घराचे दार ठोठावले. रागाच्या भरात नवऱ्याला केरसुणीने मारले, याचे बायकोला वाईट वाटत होते. ती अंथरुणातून उठली आणि तिने दाराची कडी काढली. आणि नवऱ्याने थैलीतून चमचमणाऱ्या मोहरांची रास ओतली, ते पाहून ती थक्कच झाली!
न्हावी आणि भूत
भुताचा काका
दुसऱ्या रात्री पिशवीत जायच्या भीतीने त्या बिचाऱ्या भुताने न्हाव्याच्या घरात एक मोठे कोठार बांधले. रात्रभर ते पाठीवरून भाताची मोठमोठी ओझी वाहत राहिले. शेवटी कोठार काठोकाठ भरले. त्या भुताला एक काका होता. तोही भूतच होता. पुतण्या भाताची ओझी वाहतो आहे, हे पाहून त्याने विचारले, काय भानगड आहे? पुतण्याने सगळे सांगितले. “मूर्खा!” काका म्हणाला. “न्हावी तुला पिशवीत टाकू शकतो, असे तुला वाटते? तो न्हावी महा लबाड आहे. तुझ्यासारखा भोळा सापडला, आणि त्याने तुला फसवले.” “न्हाव्याच्या ताकदीवर तुझा विश्वास नाही?” पुतण्या म्हणाला. “चल, येऊन बघ.” म्हणून काका-भूत न्हाव्याच्या घरी गेला आणि खिडकीतून आत डोकावला. काका-भूत येताच वाऱ्याचा एक झोत आला. त्यावरून खिडकीत भूत आहे, हे न्हाव्याने ओळखले. त्याने तोच आरसा त्याच्यासमोर धरला आणि म्हणाला, “ये, ये, तुलाही पिशवीत टाकतो.” आरशात स्वतःचे तोंड पाहून काका-भूत चांगलाच घाबरला. आजच्या आज रात्री आणखी एक कोठार बांधतो, आणि या वेळी साळीने नाही, तर तांदळाने भरतो, असे त्याने कबूल केले. अशा रीतीने दोन रात्रींत न्हावी श्रीमंत झाला. मग तो बायकोबरोबर सुखाने राहिला, आणि त्यांना मुलगे-मुली झाल्या. ही गोष्ट लालबिहारी डे यांना बंगाली भाषेत सांगितली गेली. त्यांनी ती इंग्रजीत आणली आणि १८८३ मध्ये बंगालच्या लोककथांच्या पुस्तकात छापली.