बंगालच्या लोककथा
सबूर राजपुत्र
सात मुली
एका व्यापाऱ्याला सात मुली होत्या. एके दिवशी त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोणाच्या नशिबावर खाता?” थोरली म्हणाली, “बाबा, मी तुमच्या नशिबावर खाते.” दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी, सगळ्यांनी हेच उत्तर दिले. पण धाकटी म्हणाली, “मी माझ्या स्वतःच्या नशिबावर खाते.” व्यापाऱ्याला तिचा फार राग आला. “मी स्वतःच्या नशिबावर जगते, असे म्हणतेस? एवढी कृतघ्न तू!” तो म्हणाला. “मग एकटी कशी निभावतेस, तेच बघतो. आजच्या आज तू माझे घर सोडायचे. खिशात एक पैसाही न घेता.” त्याने लगेच आपल्या पालखीच्या भोयांना बोलावले. हिला घेऊन जा आणि घनदाट जंगलाच्या मधोमध सोडून या, असा त्याने हुकूम दिला. माझी शिवणाची पेटी, सुया-दोरे तरी बरोबर नेऊ द्या, अशी मुलीने विनवणी केली. तेवढी परवानगी मिळाली. ती पालखीत बसली, आणि भोयांनी पालखी खांद्यावर घेतली. “हुं! हुं! हुं! हुं!” करत ते काही शे पावलेही गेले नसतील, तोच एका म्हातारीने त्यांना थांबायला हाक मारली. ती व्यापाऱ्याच्या धाकट्या मुलीची दाई होती. “माझ्या लेकीला कुठे नेताय?” तिने विचारले. “व्यापाऱ्याचा हुकूम आहे,” भोई म्हणाले. “हिला नेऊन जंगलाच्या मधोमध सोडायचे. आम्ही त्याप्रमाणे करतो आहोत.” “मग मीही तिच्याबरोबर येणार,” म्हातारी म्हणाली. “आमच्याबरोबर कशी चालशील?” भोयांनी विचारले. “आम्हाला धावत जायचे आहे.” “काहीही करून, माझी लेक जाईल तिथे मी जाणार,” ती म्हणाली. शेवटी मुलीने विनवले, आणि म्हातारीलाही तिच्याबरोबर पालखीत बसवले. दुपारी भोई एका घनदाट जंगलात पोहोचले. ते त्यात खोल आत गेले. सूर्य मावळायच्या सुमाराला त्यांनी मुलीला आणि म्हातारीला एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी उतरवले, आणि ते घरी परतले.
सबूर राजपुत्र
उघडणारे झाड
व्यापाऱ्याची धाकटी मुलगी जेमतेम चौदा वर्षांची होती. ती सुखात वाढली होती. आणि आता सूर्य मावळताना ती एका अफाट जंगलाच्या मधोमध होती. जवळ एक दमडीही नव्हती. रक्षणाला एका म्हाताऱ्या, अशक्त बाईशिवाय कोणी नव्हते. जंगलातल्या झाडांनाही तिची दया आली. ज्या मोठ्या झाडाच्या बुंध्याशी त्या दोघी रडत होत्या, ते झाड तिच्याशी बोलले. त्या काळी झाडे बोलू शकत. “बिचारी पोर! मला तुझी फार दया येते. थोड्याच वेळात जंगलातली हिंस्र जनावरे शिकारीसाठी आपापल्या गुहांतून बाहेर पडतील. ती तुम्हा दोघींना नक्की खाऊन टाकतील. पण मी तुम्हाला मदत करू शकते. मी माझ्या खोडाला एक भगदाड पाडते. तुम्ही आत जा. मग मी ते पुन्हा बंद करीन. आत तुम्ही सुरक्षित राहाल. जनावरे तुम्हाला हातही लावू शकणार नाहीत.” क्षणार्धात खोड दुभंगले. मुलगी आणि म्हातारी त्या पोकळीत शिरल्या, आणि झाड पुन्हा मिटले. रात्र झाली, तशी हिंस्र जनावरे बाहेर पडली: क्रूर वाघ, रानटी अस्वल आणि केसाळ अस्वल, जाड कातडीचा गेंडा, माजलेला हत्ती आणि शिंगाळे रानरेडे. त्यांना माणसाच्या रक्ताचा वास आला. झाडाभोवती ती गुरगुरत फिरू लागली. ती झाडावर धडका देऊ लागली. त्यांनी त्याच्या फांद्या मोडल्या, शिंगांनी खोड भोसकले, नखांनी साल ओरबाडली. पण काही उपयोग झाला नाही. आतल्या दोघी सुरक्षित होत्या. पहाट होत आली, तशी जनावरे निघून गेली. सूर्योदयानंतर ते दयाळू झाड त्यांना म्हणाले, “बायांनो, हिंस्र जनावरे मला खूप जखमा करून आपापल्या गुहांत परत गेली आहेत. सूर्य उगवला आहे. आता तुम्ही बाहेर येऊ शकता.” ते पुन्हा दुभंगले, आणि त्या बाहेर आल्या.
सबूर राजपुत्र
पाच कवड्या
जनावरांनी झाडाचे किती नुकसान केले होते, ते त्यांना दिसले. कितीतरी फांद्या मोडल्या होत्या. खोड जागोजागी भोसकले होते, आणि कित्येक ठिकाणी साल सोलून निघाली होती. “आई,” मुलगी झाडाला म्हणाली, “तू किती दयाळू आहेस! आम्हाला आसरा देण्यासाठी तू एवढे सोसलेस. काल रात्री जनावरांनी तुझे जे केले, त्याने तुला फार वेदना होत असतील.” ती झाडाजवळच्या तळ्यावर गेली आणि भरपूर चिखल घेऊन आली. तो तिने खोडावर लिंपला. विशेषतः जिथे खोड भोसकले होते आणि जिथे ओरबाडले होते, तिथे. “गुणाची पोर माझी,” झाड म्हणाले. “आता माझ्या वेदना खूप कमी झाल्या. पण मला माझी तितकी काळजी नाही, जितकी तुम्हा दोघींची. तुम्हाला भूक लागली असेल. काल दिवसभर तुम्ही काही खाल्ले नाही. आणि मी तुम्हाला काय देणार? मला तर स्वतःची फळेही नाहीत. तुमच्याजवळ असतील ते पैसे म्हातारीला द्या. तिला जवळच्या शहरात जाऊन काहीतरी खायला आणू द्या.” आमच्याजवळ पैसे नाहीत, असे त्या म्हणाल्या. पण मुलीने आपली शिवणाची पेटी धुंडाळली, तेव्हा तिला पाच कवड्या सापडल्या. त्या कवड्या घेऊन शहरात जा आणि लाह्या आण, असे झाडाने म्हातारीला सांगितले. शहर फार दूर नव्हते. म्हातारी एका मिठाईवाल्याकडे गेली आणि पाच कवड्यांच्या लाह्या द्या, म्हणाली. तो तिच्यावर हसला. “चालती हो, थेरडे! पाच कवड्यांत लाह्या मिळतील, असे वाटले की काय?” ती दुसऱ्या दुकानात गेली. त्या दुकानदाराने पाहिले, हिला फार गरज आहे. त्याला दया आली, आणि पाच कवड्यांच्या बदल्यात त्याने तिला लाह्यांचा मोठा ढीग दिला.
सबूर राजपुत्र
मोराची पिसे
म्हातारी लाह्या घेऊन परत आली. तेव्हा झाड मुलीला म्हणाले, “तुम्ही दोघी थोड्या थोड्या लाह्या खा. अर्ध्याहून जास्त बाजूला ठेवा. आणि उरलेल्या लाह्या तळ्याच्या काठावर चहूकडे पसरा.” त्यांनी तसे केले. तळ्याच्या काठावर लाह्या का पसरायच्या, ते मात्र त्यांना कळत नव्हते. दिवसभर त्या आपल्या नशिबाला रडत बसल्या. रात्री झाडाने त्यांना पुन्हा खोडात घेतले. जनावरे आधीसारखीच आली. आदल्या रात्रीपेक्षाही जास्त त्यांनी झाडाला घायाळ केले, ओरबाडले. पण त्या रात्री तळ्याच्या काठावर काहीतरी घडत होते. ते काय, ते त्या दोघींना दुसऱ्या दिवशी सकाळीच दिसले. सुंदर पिसाऱ्यांचे शेकडो मोर लाह्या खायला काठावर आले होते. लाह्यांसाठी ते भांडले, आणि त्यांची पुष्कळ पिसे गळून पडली. पहाटेच झाडाने दोघींना ती पिसे गोळा करायला सांगितले. त्या पिसांचा मुलीने एक सुंदर पंखा केला. तो पंखा शहरातल्या राजवाड्यात गेला. राजपुत्राला तो फार आवडला. त्याने त्याची भरपूर किंमत दिली. रोज सकाळी गोळा करायला आणखी पिसे असत. म्हणून रोज एक पंखा तयार होई आणि विकला जाई. थोड्याच दिवसांत दोघी श्रीमंत झाल्या. मग राहायला घर बांधण्यासाठी माणसे लावा, असे झाडाने त्यांना सांगितले. विटा भाजल्या, तुळया आणि वासे यांसाठी झाडे तोडली, चुना तयार केला. काही महिन्यांतच व्यापाऱ्याच्या मुलीसाठी आणि तिच्या म्हाताऱ्या दाईसाठी राजवाड्यासारखे भव्य घर उभे राहिले. घराभोवती बाग केली, आणि बागेला पाणी द्यायला एक तळे खणायला घेतले.
सबूर राजपुत्र
तळ्यावरचे मजूर
इकडे लक्ष्मींनी व्यापाऱ्याकडे, त्याच्या बायकोकडे आणि सहा मुलींकडेही पाठ फिरवली होती. अचानक त्याचे सगळे पैसे गेले. घर आणि त्याचे सगळे काही विकले गेले. तो आणि त्याचे कुटुंब कफल्लक होऊन रस्त्यावर आले. योगायोग असा, की ते राहायला गेले ते गाव त्या दोघी अनोळखी बायकांच्या राजवाड्यापासून फार दूर नव्हते. तिथे त्या दोघी आता तळे खणवत होत्या. एकेकाळचा श्रीमंत व्यापारी आता हातमजुरी करून रोज मिळेल त्या थोड्या पैशांत घर चालवत होता. जंगलाच्या कडेला राहणाऱ्या त्या अनोळखी बाईचे तळे खणायला मजूर म्हणून जावे, असे त्याने ठरवले. मीही खणायला येते, असे त्याची बायको म्हणाली. एके दिवशी घराची मालकीण वेळ घालवायला राजवाड्याच्या खिडकीतून मजुरांकडे पाहत होती. तिला मोठे आश्चर्य वाटले. तिचे आई-वडील राजवाड्याकडे येत होते. रोजंदारीवर काम करायला, असे दिसत होते. त्यांच्या अंगावर चिंध्या होत्या. त्यांच्याकडे बघताना तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. तिने लगेच नोकरांना पाठवून त्यांना घरात बोलावून घेतले. ते दोघे फार घाबरले. चिंध्या टाकून द्या आणि हे उंची कपडे घाला, असे त्यांना सांगितले. पण मालकिणीने लवकरच त्यांची भीती दूर केली. मी तुमची मुलगी, असे तिने सांगितले. ती त्यांच्या गळ्यात पडून रडली. तिच्यावर जे जे बेतले होते, ते तिने त्यांना सांगितले. मी स्वतःच्या नशिबावर जगते, हे तिचे म्हणणे खरे होते, हे वडिलांना पटले. तिने वडिलांना भरपूर संपत्ती दिली. ती घेऊन तो पूर्वीच्या शहरात परत गेला आणि पुन्हा व्यापार करू लागला.
सबूर राजपुत्र
ऐकण्यातली चूक
आता दूरदेशी जाऊन व्यापार करायचे, असे व्यापाऱ्याने ठरवले. सगळी तयारी झाल्यावर तो जहाजावर चढला. पण काय नवल! जहाज जागचे हलेचना. काय करावे, ते त्याला सुचेना. शेवटी त्याला एक गोष्ट आठवली. घरी असलेल्या सहा मुलींना त्याने विचारले होते, तुमच्यासाठी काय आणू? पण ज्या सातव्या मुलीने त्याला श्रीमंत केले, तिला मात्र विचारले नव्हते. म्हणून त्याने लगेच धाकट्या मुलीकडे एक निरोप्या पाठवला. तुझ्यासाठी काय आणू, हे विचारायला. बंगालीत, आणि आपल्या मराठीतही, ‘सबूर’ म्हणजे ‘थांब, धीर धर’. निरोप्या पोहोचला, तेव्हा ती पूजेला बसली होती. वडिलांकडून निरोप्या आला आहे, हे ऐकून ती त्याला म्हणाली, “सबूर!” म्हणजे, जरा थांब. पण निरोप्याला वाटले, हेच तिचे उत्तर. तिला वडिलांकडून ‘सबूर’ नावाची कुठलीतरी वस्तू हवी आहे, असे त्याला वाटले. तो परत गेला आणि तसेच त्याने व्यापाऱ्याला सांगितले. आता जहाज आपोआप हलले, आणि व्यापारी प्रवासाला निघाला. तो अनेक बंदरांवर गेला. मालावर त्याने प्रचंड नफा कमावला. सहा मुलींना हव्या होत्या त्या वस्तू त्याला सहज मिळाल्या. पण धाकटीला हवा आहे असे वाटलेला तो ‘सबूर’ मात्र कुठेच मिळेना. प्रत्येक बंदरात त्याने ‘सबूर’ नावाची वस्तू मागितली. पण असली वस्तू आम्ही कधी ऐकलीच नाही, असे सगळे व्यापारी म्हणाले. शेवटच्या बंदरात तो रस्त्यांवरून ओरडत फिरला, “सबूर पाहिजे! सबूर पाहिजे!”
सबूर राजपुत्र
पेटीतला पंखा
त्या देशाच्या राजाला एक मुलगा होता. त्या राजपुत्राचे नाव होते सबूर. रस्त्यावर कोणीतरी आपलेच नाव ओरडत आहे, हे त्याने ऐकले, आणि त्याचे लक्ष तिकडे गेले. माझ्या मुलीला सबूर हवा आहे, असे व्यापाऱ्याने त्याला सांगितले. तो माझ्याकडे आहे, असे राजपुत्र म्हणाला. त्याने एक लहानशी लाकडी पेटी आणली. तिच्यात आरसा बसवलेला एक जादूचा पंखा होता. “तुमच्या मुलीला हवा आहे, तो सबूर हाच,” तो म्हणाला. अशा रीतीने इतके दिवस शोधलेला सबूर व्यापाऱ्याला मिळाला, आणि तो घरी परतला. घरी आल्यावर त्याने ती पेटी धाकट्या मुलीकडे पाठवली. ही साधी लाकडी पेटी, असे समजून तिने ती बाजूला ठेवली. काही दिवसांनी फुरसत मिळाली, तेव्हा तिला पेटीची आठवण झाली आणि तिने ती उघडली. आत आरसा बसवलेला एक सुंदर पंखा होता. तिने तो पंखा हलवला, आणि क्षणार्धात सबूर राजपुत्र तिच्यासमोर उभा राहिला. “तू मला बोलावलेस, म्हणून मी आलो,” तो म्हणाला. “तुझी काय इच्छा आहे?” एवढा देखणा राजपुत्र असा अचानक प्रकट झालेला पाहून ती थक्क झाली. तू कोण, आणि इथे कसा आलास, असे तिने त्याला विचारले. ती पेटी मी तुझ्या वडिलांना कशी दिली, ते राजपुत्राने सांगितले. त्याने तिला गुपितही सांगितले: पंखा हलवला, की तो प्रकट होई. तो दोन-एक दिवस तिच्या घरी राहिला, आणि तिने त्याची चांगली सरबराई केली. शेवटी त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले, आणि त्यांनी लग्न करायचे वचन एकमेकांना दिले. राजपुत्र आपल्या पित्याकडे, राजाकडे, परत गेला. मी बायको निवडली आहे, असे त्याने सांगितले. लग्नाचा दिवस ठरला. व्यापाऱ्याला आणि त्याच्या सहा मुलींना आमंत्रण गेले. लग्न झाले. पण धाकट्या बहिणीचे भाग्य पाहून सहा बहिणींना तिचा हेवा वाटत होता. तिच्या नवऱ्याला मारायचे, असे त्यांनी ठरवले होते. त्यांनी काही बाटल्या फोडल्या, काचा कुटून बारीक पूड केली आणि ती लग्नाच्या शेजेवर भरपूर पसरली. राजपुत्राला काहीच शंका आली नाही. तो पलंगावर झोपला. दोन मिनिटांत काचेची पूड त्याच्या अंगाच्या प्रत्येक रंध्रात घुसली. सगळ्या अंगाला भयंकर वेदना होऊ लागल्या. तो मोठमोठ्याने किंचाळू लागला. त्याच्या सेवकांनी त्याला घाईघाईने त्याच्या देशी नेले.
सबूर राजपुत्र
तरुण संन्यासी
सबूर राजपुत्राच्या आई-वडिलांनी, राजा-राणीने, राज्यातल्या सगळ्या वैद्यांना बोलावले. पण कोणालाच काही करता आले नाही. तरुण राजपुत्र रात्रंदिवस वेदनेने किंचाळत होता. त्याला काय झाले आहे, ते कोणालाच सांगता येईना. मग ते बरे करणे तर दूरच. त्याची नववधू दुःखाने व्याकूळ झाली. लग्न होताक्षणीच तिच्या नवऱ्याला एका भयंकर आजाराने गाठले होते. निदान तिला तरी तसे वाटत होते. आणि त्याला शेकडो मैल दूर नेले होते. तिने त्याचा देश कधी पाहिला नव्हता. तरी तिथे जाऊन त्याची सेवा करायची, असा तिने निश्चय केला. तिने संन्याशाचा वेष घेतला आणि हातात कट्यार घेऊन ती निघाली. ती तरुण होती. पायी लांबचा प्रवास करायची तिला सवय नव्हती. त्यामुळे ती लवकरच थकली आणि विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसली. त्या झाडाच्या शेंड्यावर बिहंगम आणि त्याची जोडीदारीण बिहंगमी यांचे घरटे होते. ते दोघे देवांचे ज्ञानी पक्षी होते. ते बाहेर गेले होते, पण त्यांची दोन पिले घरट्यात होती. अचानक पिले किंचाळली. अर्धवट झोपेत असलेल्या त्या तरुण संन्याशाला जाग आली. तिला दिसले, एक प्रचंड नाग फणा काढून झाडावर चढायच्या बेतात आहे. विजेच्या वेगाने तिने त्याचे दोन तुकडे केले, आणि पिलांचे किंचाळणे थांबले. थोड्याच वेळात बिहंगम आणि बिहंगमी आकाशातून उडत घरी आले. “नेहमीप्रमाणे आपल्या त्या मोठ्या शत्रूने, नागाने, आपली पिले पुन्हा खाल्ली असणार,” बिहंगमी म्हणाली. “अरे देवा, पिलांचा आवाजच येत नाही.” पण घरट्यात पोहोचल्यावर पिले जिवंत पाहून त्यांना आनंद झाला. झाडाखालच्या तरुण संन्याशाने नागाला कसे मारले, ते पिलांनी त्यांना सांगितले. आणि खरोखरच, खाली दोन तुकडे झालेला नाग पडला होता.
सबूर राजपुत्र
पक्षी काय बोलले
“त्या तरुण संन्याशाने आपल्या पिलांना मरणातून वाचवले,” बिहंगमी आपल्या जोडीदाराला म्हणाली. “त्याच्यासाठी आपण बदल्यात काहीतरी करावे, असे मला वाटते.” “तिच्यासाठी आपण लवकरच काहीतरी करू,” बिहंगम म्हणाला, “कारण झाडाखाली बसलेला तो पुरुष नाही, स्त्री आहे.” ती मुलगी कोण, हे त्याने तिला सांगितले: सबूर राजपुत्राची नववधू. लग्नाच्या रात्रीच काचेच्या पुडीने तिच्या नवऱ्याची ही दशा झाली होती. “तो अजून त्याच्या देशात वेदनेने तळमळतो आहे,” बिहंगम म्हणाला. “खरे तर तो मरणाच्या दारात आहे. आणि त्याची ही धाडसी बायको संन्याशाचा वेष घेऊन त्याची सेवा करायला निघाली आहे.” “पण राजपुत्रावर काहीच उपाय नाही का?” बिहंगमीने विचारले. “आहे ना,” बिहंगम म्हणाला. “आपली विष्ठा इथे चहूकडे जमिनीवर वाळून कडक झाली आहे. तिची बारीक पूड करायला हवी. आधी राजपुत्राला सात वेळा स्नान घालायचे, पाण्याच्या सात घड्यांनी आणि दुधाच्या सात घड्यांनी. मग ती पूड कुंचल्याने त्याच्या अंगाला लावायची. असे केले, तर सबूर राजपुत्र नक्की बरा होईल.” “पण ती बिचारी पोर एवढ्या लांब चालत कशी जाणार?” बिहंगमीने विचारले. “तिला कितीतरी दिवस लागतील. तोपर्यंत तो बिचारा राजपुत्र मरून जाईल.” “मी त्या तरुणीला माझ्या पाठीवरून नेईन,” बिहंगम म्हणाला. “सबूर राजपुत्राच्या नगरात तिला उतरवीन आणि परत घेऊन येईन. फक्त तिने तिथे कोणतीही भेट स्वीकारायची नाही.” संन्याशाच्या वेषातल्या मुलीने हे सगळे ऐकले होते. मला तुमच्या पाठीवरून न्या, अशी तिने बिहंगमाला विनवणी केली. पक्ष्याने आनंदाने होकार दिला. पाठीवर बसण्यापूर्वी तिने पक्ष्यांची भरपूर विष्ठा गोळा केली आणि तिची बारीक पूड केली. ते औषध घेऊन ती त्या दयाळू पक्ष्याच्या पाठीवर बसली. ते विजेच्या वेगाने आकाशातून उडाले आणि लवकरच सबूर राजपुत्राच्या नगरात पोहोचले.
सबूर राजपुत्र
अंगठी
तरुण संन्यासी राजवाड्याच्या दाराशी गेला आणि त्याने राजाला निरोप पाठवला. माझ्याकडे प्रभावी औषधे आहेत, मी काही तासांत राजपुत्राला बरे करीन, असे त्याने कळवले. देशातल्या उत्तमोत्तम वैद्यांचे उपाय राजाने करून पाहिले होते, पण व्यर्थ. हा संन्यासी नुसता ढोंगी असावा, असे राजाला वाटले. पण त्याला एक संधी द्यावी, असा मंत्र्यांनी सल्ला दिला, आणि राजा तयार झाला. संन्याशाने पाण्याचे सात घडे आणि दुधाचे सात घडे मागवले, आणि ते सगळे राजपुत्राच्या अंगावर ओतले. मग पिसाने त्याने आपली पूड राजपुत्राच्या अंगाच्या प्रत्येक रंध्रावर लावली. त्यानंतर राजपुत्रावर पाण्याचे सात घडे आणि दुधाचे सात घडे आणखी सहा वेळा ओतले. अंग कोरडे पुसल्यावर राजपुत्राला पूर्ण बरे वाटले. “माझ्या खजिन्यातले सर्वांत मौल्यवान धन या अद्भुत वैद्याला द्या,” असा राजाने हुकूम दिला. पण संन्याशाने त्यातले काहीच घेतले नाही. आठवण म्हणून त्याने फक्त राजपुत्राच्या बोटातली अंगठी मागितली. अंगठी तिला आनंदाने मिळाली, आणि मुलीने ती जपून ठेवली. ती घाईने समुद्रकिनारी गेली. तिथे बिहंगम तिची वाट पाहत होता. क्षणार्धात ते पक्ष्यांच्या झाडापाशी परत आले. तिथून ती चालत जंगलाच्या कडेच्या आपल्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी तिने जादूचा पंखा हलवला, आणि लगेच सबूर राजपुत्र तिच्यासमोर उभा राहिला. तिने त्याला अंगठी दाखवली. आपल्याला बरे करणारा वैद्य म्हणजे आपलीच बायको, हे कळल्यावर तो थक्क झाला. राजपुत्र आपल्या नववधूला दूरच्या राज्यातल्या आपल्या राजवाड्यात घेऊन गेला. त्याने बायकोच्या सहा बहिणींना क्षमा केली. तो आणि त्याची बायको कित्येक तपे सुखाने राहिले. त्यांना मुले, नातवंडे आणि पतवंडे झाली. ही गोष्ट लालबिहारी डे यांना बंगाली भाषेत सांगितली गेली. त्यांनी ती इंग्रजीत आणली आणि १८८३ मध्ये बंगालच्या लोककथांच्या पुस्तकात छापली.