बंगालच्या लोककथा
टकली बायको
दोन सवती
एका माणसाला दोन बायका होत्या. धाकटीवर त्याचे थोरलीपेक्षा जास्त प्रेम होते. धाकटीच्या डोक्यावर केसांच्या दोन बटा होत्या, आणि थोरलीच्या डोक्यावर एकच. तो माणूस व्यापारासाठी दूरच्या एका शहरी गेला. त्यामुळे दोघी सवती घरात एकत्र राहू लागल्या. पण त्यांचे एकमेकींशी वैर होते. धाकटी नवऱ्याची लाडकी होती. ती थोरलीला वाईट वागवी. घरातली सगळी जड-ओबड कामे तिच्याकडून करून घेई. रात्रंदिवस तिला टाकून बोले. आणि तिला पोटभर खायलाही देत नसे. एके दिवशी धाकटी थोरलीला म्हणाली, “ये, माझ्या डोक्यातल्या सगळ्या उवा काढ.” थोरली तिच्या केसांत उवा शोधत होती. तेवढ्यात चुकून धाकटीच्या केसांची एक बट निघून आली. धाकटी संतापाने लाल झाली. तिने थोरलीच्या डोक्यावरची एकुलती एक बट उपटून काढली आणि तिला घराबाहेर हाकलून दिले. आता थोरली पार टकली झाली. जंगलात जायचे, आणि तिथे उपाशी मरायचे, नाहीतर एखाद्या जंगली जनावराच्या तोंडी पडायचे, असे तिने ठरवले. वाटेत तिला कापसाचे एक झाड लागले. ती त्याच्यापाशी थांबली. आजूबाजूला पडलेल्या काटक्यांचा तिने एक खराटा केला, आणि झाडाभोवतीची सगळी जमीन झाडून स्वच्छ केली. झाडाला फार आनंद झाला, आणि त्याने तिला आशीर्वाद दिला. पुढे गेल्यावर तिला एक केळ लागली. तिच्याभोवतीही तिने झाडले. केळ तिच्यावर खूश झाली आणि तिनेही तिला आशीर्वाद दिला.
टकली बायको
जंगलातले मुनी
आणखी पुढे तिला देवाला सोडलेल्या एका वळूचा गोठा दिसला. गोठा फार घाण झाला होता. तिने तो झाडून स्वच्छ केला. वळू फार खूश झाला आणि त्याने तिला आशीर्वाद दिला. मग तिला एक तुळस दिसली. तिने तुळशीला नमस्कार केला आणि तिच्याभोवतीची जमीन स्वच्छ केली. तुळशीने तिला आशीर्वाद दिला. पुढे जाताना तिला फांद्या-पानांची एक झोपडी दिसली. तिच्याजवळ एक जण मांडी घालून बसले होते. ते ध्यानात मग्न असावेत, असे दिसत होते. ते एक मुनी होते. क्षणभर ती त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. “तू कोणीही असलीस, तरी माझ्यासमोर ये,” ते म्हणाले. “माझ्या पाठीमागे उभी राहू नकोस. राहिलीस, तर मी तुला जाळून भस्म करीन.” ती भीतीने थरथर कापत मुनींच्या समोर जाऊन उभी राहिली. “तुला काय हवे आहे?” मुनींनी विचारले. “मुनिबाबा,” ती म्हणाली, “मी किती दुःखी आहे, हे आपण जाणताच. आपण सर्वज्ञ आहात. माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही. आणि त्याच्या दुसऱ्या बायकोने माझ्या डोक्यावरची एकुलती एक बट उपटून मला घराबाहेर हाकलून दिले आहे. मुनिबाबा, माझ्यावर दया करा!” मुनी जागचे हलले नाहीत. बसल्या जागीच ते म्हणाले, “ते पलीकडे तळे दिसते ना, त्यात जा. फक्त एकदाच डुबकी मार, आणि मग माझ्याकडे परत ये.”
टकली बायको
मुनींचे तळे
ती तळ्यावर गेली आणि तिने त्यात अंग धुतले. मग मुनींनी सांगितल्याप्रमाणे फक्त एकदाच डुबकी मारली. पाण्यातून बाहेर आली, तर काय! ती पार बदलून गेली होती. तिचे डोके काळ्याभोर केसांनी भरले होते. केस इतके लांब, की टाचांपर्यंत पोहोचत होते. तिचा रंग अगदी गोरापान झाला होता, आणि ती तरुण, सुंदर दिसत होती. आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून ती मुनींकडे परत गेली आणि तिने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. “ऊठ, बाई,” ते म्हणाले. “झोपडीत जा. तिथे वेताच्या बऱ्याच टोपल्या आहेत. तुला हवी ती एक बाहेर घेऊन ये.” ती झोपडीत गेली आणि तिने एक साधीसुधी दिसणारी टोपली निवडली. “टोपली उघड,” मुनी म्हणाले. तिने ती उघडली. टोपली सोन्याच्या लगडींनी, मोत्यांनी आणि सगळ्या प्रकारच्या रत्नांनी भरलेली होती. “बाई, ही टोपली घेऊन जा,” मुनी म्हणाले. “ती कधीही रिकामी होणार नाही. आतले काढलेस, की त्याच्या जागी आणखी भरेल, मग आणखी, मग आणखी. टोपली कधीच रिकामी होणार नाही. मुली, सुखाने जा.” कृतज्ञतेने मूकपणे तिने जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला, आणि ती निघाली. हातात टोपली घेऊन ती घरी परत चालली होती. वाटेत, जिच्याभोवती तिने झाडले होते, ती तुळस लागली. “बाळा, सुखाने जा!” तुळस म्हणाली. “तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करेल.”
टकली बायको
परतीच्या वाटेवरच्या भेटी
मग ती वळूच्या गोठ्यापाशी आली. वळूने आपल्या शिंगांभोवती गुंडाळलेले शंखाचे दोन दागिने तिला दिले. “मुली, हे शंख घे आणि मनगटांवर घाल,” तो म्हणाला. “यांतला कोणताही हलवलास, की तुला हवे ते दागिने मिळतील.” मग ती केळीपाशी आली. केळीने तिला आपले एक रुंद पान दिले. “बाळा, हे पान घे,” ती म्हणाली. “हे हलवलेस, की तुला सगळ्या प्रकारची गोड केळी तर मिळतीलच, पण हरतऱ्हेचे चांगलेचुंगले अन्नही मिळेल.” सगळ्यात शेवटी ती कापसाच्या झाडापाशी आली. त्याने स्वतःची एक फांदी तिला दिली. “मुली, ही फांदी घे,” ते म्हणाले. “ही हलवलीस, की तुला सगळ्या प्रकारची सुती वस्त्रे तर मिळतीलच, पण रेशमी आणि जांभळी वस्त्रेही मिळतील. आत्ता माझ्यासमोर हलवून बघ.” तिने फांदी हलवली, आणि अतिशय उंची, चकचकीत रेशमाचा एक तागा तिच्या ओटीत पडला. तिने ते रेशमी वस्त्र नेसले. मनगटांवर शंख, आणि हातात टोपली, फांदी आणि पान घेऊन ती पुढे निघाली. धाकटी घराच्या दारात उभी होती. एक सुंदर स्त्री आपल्याकडे येताना तिला दिसली. तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ती म्हातारी टकली बाई सगळ्या स्त्रियांत सुंदर झाली होती.
टकली बायको
धाकटी निघते
आता श्रीमंत आणि सुंदर झालेली थोरली धाकटीशी प्रेमाने वागली. तिने तिला उंची कपडे, मौल्यवान दागिने आणि उत्तमोत्तम पक्वान्ने दिली. पण काही उपयोग झाला नाही. थोरलीचे सौंदर्य आणि तिचे केस पाहून धाकटीला मत्सर वाटे. थोरलीला हे सगळे जंगलातल्या मुनिबाबांकडून मिळाले, असे तिने ऐकले. मग तिनेही तिथे जायचे ठरवले. ती निघाली. कापसाचे झाड दिसले, पण तिने त्याच्यासाठी काहीच केले नाही. केळ, वळूचा गोठा, तुळस, सगळ्यांकडे दुर्लक्ष करून ती पुढे गेली. ती मुनींकडे आली. तळ्यात स्नान कर आणि एकदाच डुबकी मार, असे मुनींनी तिलाही सांगितले. तिने एकदा डुबकी मारली, आणि ती सुंदर दाट केस आणि गोरापान रंग घेऊन वर आली. पण तिला वाटले, दुसरी डुबकी मारली, तर आपण आणखी सुंदर होऊ. म्हणून तिने पुन्हा पाण्यात डुबकी मारली. आणि बाहेर आली, ती पूर्वीसारखीच टकली आणि कुरूप होऊन. ती मुनींकडे जाऊन रडू लागली. पण मुनींनी तिला हाकलून दिले. “चालती हो, आज्ञा न पाळणाऱ्या बाई,” ते म्हणाले. “माझ्याकडून तुला काहीही वर मिळणार नाही.” दुःखाने वेडीपिशी होऊन ती घरी परत गेली. मग दोघींचा नवरा प्रवासाहून घरी परतला. आपल्या पहिल्या बायकोचे लांब केस आणि सौंदर्य पाहून तो थक्क झाला. त्याचे तिच्यावर अतिशय प्रेम बसले. आणि तिची गुप्त भांडारे आणि अमाप संपत्ती पाहिल्यावर तर तो तिची जवळजवळ पूजाच करू लागला. ते दोघे पुढे पुष्कळ वर्षे सुखाने राहिले. आणि एके काळी नवऱ्याची लाडकी असलेली धाकटी त्यांची मोलकरीण झाली.
टकली बायको
माझी गोष्ट सरली
बंगालमध्ये प्रत्येक खरा कथेकरी गोष्टीच्या शेवटी हेच गाणे म्हणतो. ते असे: इथे माझी गोष्ट सरली, / काटेमाठाची काडी सुकली. / “काटेमाठा रे काटेमाठा, का रे सुकलास?” / “तुझी गाय मला का चरते?” / “गाई गं गाई, का गं चरतेस?” / “तुझा गुराखी मला का राखत नाही?” / “गुराख्या रे गुराख्या, गाय का रे राखत नाहीस?” / “तुझी सून मला भात का देत नाही?” / “सूनबाई गं सूनबाई, भात का गं देत नाहीस?” / “माझे बाळ का रडते?” / “बाळा रे बाळा, का रे रडतोस?” / “मुंगी मला का चावते?” / “मुंगी गं मुंगी, का गं चावतेस?” / कुट् कुट् कुट्! या गोष्टी लिहून ठेवणाऱ्या लालबिहारी डे यांना या ओळींचा अर्थ ठाऊक नव्हता. प्रत्येक गोष्टीच्या शेवटी त्या का म्हणतात, हेही त्यांना माहीत नव्हते. कदाचित लहान मुलांची करमणूक व्हावी, म्हणून नुसते निरर्थक शब्द एकत्र गुंफलेले असतील, असे त्यांना वाटले. ही गोष्ट लालबिहारी डे यांना बंगाली भाषेत सांगितली गेली. त्यांनी ती इंग्रजीत आणली आणि १८८३ मध्ये बंगालच्या लोककथांच्या पुस्तकात छापली.