काश्मीरच्या लोककथा
चतुर पोपट
सगळे सांगणारा पोपट
एका फकिराकडे एक फार हुशार, बोलका पोपट होता. फकिराचा त्याच्यावर फार जीव होता. तो त्याला मोलाचा मानत असे. एके दिवशी फकिराला बरे वाटत नव्हते. तो पोपटाला म्हणाला, “तू मला कधी काही बातमी सांगत नाहीस. काहीच सांगत नाहीस.” “बरे, सांगेन,” पोपट म्हणाला. “आतापर्यंत मी घाबरत होतो. तुम्हाला ऐकायला नको असे काही कानावर पडेल, म्हणून.” “त्याची काळजी करू नकोस,” फकीर म्हणाला. “मला सगळे सांग.” दुसऱ्या दिवशी सकाळी फकिराला एका गावाला जायचे होते. निघण्यापूर्वी त्याने बायकोला कोंबडी शिजवायला सांगितली. अर्धी तिने खायची आणि अर्धी त्याच्यासाठी गरम ठेवायची. पण बाईने सगळी कोंबडी खाऊन टाकली. तिला इतकी भूक लागली होती आणि कोंबडी इतकी चविष्ट झाली होती, की तिला थांबताच आले नाही. संध्याकाळी फकीर घरी आला आणि त्याने कोंबडी मागितली. तेव्हा ती म्हणाली, “मांजराने खाल्ली.” “बरे, बरे, इलाज नाही,” तो म्हणाला. “मला दुसरे काहीतरी करून दे. फार भूक लागली आहे. सकाळी घरातून निघाल्यापासून मी काही खाल्लेले नाही.” ती स्वयंपाक करत होती, तेवढ्यात फकिराने पोपटाला विचारले, “काय रे माझ्या लाडक्या, आजची बातमी काय?” “तुमची बायको तुमच्याशी खोटे बोलली,” पोपट म्हणाला. “कोंबडी तिनेच खाल्ली. सगळी कोंबडी खाताना मी तिला पाहिले.”
चतुर पोपट
पोपट जायलाच हवा
बाईने सगळे नाकारले. घरात शांतता राहावी म्हणून फकिराने तिच्यावर विश्वास बसल्याचे दाखवले. पण त्यानंतर असा पक्षी घरात असताना तिला कधीच चैन पडेना. ती काही छचोर नव्हती, नवऱ्याशी बेइमान नव्हती, की चोरही नव्हती. पण जरा वेगळे असे काही तिने केले, तरी पोपट ते पाही आणि फकिराला सांगे. शेवटी ती नवऱ्याकडे गेली. “आपण वेगळे झालेलेच बरे,” ती म्हणाली. “आता तुला तो पोपटच सर्वस्व झाला आहे. माझ्या शब्दापेक्षा तुला त्याच्या शब्दावर जास्त विश्वास. माझ्यापेक्षा त्याच्याशी बोलणेच तुला आवडते. आता मला हे सहन होत नाही. एकतर मला घालवून दे, नाहीतर पोपटाला. आपण तिघे एका छपराखाली सुखाने राहू शकत नाही.” फकिराचे बायकोवर फार प्रेम होते. तिच्या बोलण्याने त्याला फार दुःख झाले. त्याने पोपट विकून टाकायचे वचन दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पोपटाला घेऊन घोडीवर बसून निघाला. वाटेत पोपट म्हणाला, “मालक, माझे ऐका. मी सांगेन ती किंमत जो देणार नाही, त्याला मला विकू नका.” “ठीक आहे,” फकीर म्हणाला. “मी समजलो.” घरापासून खूप लांब, समुद्रकिनाऱ्यापर्यंत तो गेला आणि रात्री तिथेच मुक्काम करायचे त्याने ठरवले. मध्यरात्रीच्या सुमाराला तो पोपटाला म्हणाला, “मी फार दमलो आहे, पण मला झोप येत नाही. तू आणि घोडी संधी साधून पळून जाल की काय, अशी मला भीती वाटते.” “कधीच नाही,” पोपट म्हणाला. “आम्ही इतके बेइमान आहोत, असे तुम्हाला वाटते? आमच्यावर विश्वास ठेवा. घोडीला हवे तिकडे फिरू द्या. माझा पिंजरा उघडा आणि मला मोकळे सोडा. मी तुम्हाला सोडून जाणार नाही. मी त्या झाडावर जाऊन बसेन आणि रात्रभर तुमच्यावर आणि घोडीवर लक्ष ठेवेन.”
चतुर पोपट
पोपटाची किंमत
फकिराने पक्ष्यावर विश्वास ठेवला. तो सांगेल तसे केले आणि झोपी गेला. पोपट डोळ्यात तेल घालून पहारा देत होता. रात्री त्याने पाहिले, पाण्यातून एक जलघोडा वर आला. हा घोड्यासारखा दिसणारा पाण्यातला एक प्राणी होता. त्याने घोडीशी संग केला आणि तो परत पाण्यात गेला. सकाळी फकिराने पक्ष्याला बोलावले आणि पिंजऱ्यात परत ठेवले. रात्री जे पाहिले, त्याबद्दल पोपट फकिराला काहीच बोलला नाही. फकीर किनाऱ्याकिनाऱ्याने जात एका मोठ्या, श्रीमंत शहरात पोहोचला. तिथे त्याला शहराचा कोतवाल भेटला. “सलाम,” कोतवाल म्हणाला. “तुम्हाला तुमचा पक्षी विकायचा आहे का?” “हो,” फकीर म्हणाला. “पण माझी किंमत तुम्हाला परवडणार नाही,” पोपट म्हणाला. “काय अद्भुत पक्षी आहे!” कोतवाल उद्गारला. “हे वजिरांना सांगायलाच हवे. त्यांना असा पक्षी कधीपासून हवा आहे. चला लवकर माझ्याबरोबर. ते राजदरबारात जाण्याआधी पोहोचू.” मग दोघे मिळून वजिराच्या घरी चालत गेले. वजिराने कोतवालाचे आभार मानले. “पण राजांना हा पक्षी हवा आहे का, हे कळल्याशिवाय मी तो माझ्यासाठी विकत घेण्याचा विचारही करू शकत नाही,” तो म्हणाला. “परवाच मी ऐकले, ते अशा पक्ष्याची चौकशी करत होते.” म्हणून तिघेही राजवाड्यात गेले. “पक्ष्याची किंमत काय?” राजाने विचारले. “दहा हजार रुपये,” पोपटाने उत्तर दिले. पोपटाचे स्पष्ट आणि चटकन दिलेले उत्तर ऐकून राजा इतका खूश झाला की त्याने लगेच पैसे दिले. एवढी मोठी रक्कम मिळाल्याने फकिराला फार आनंद झाला. तो निघण्यापूर्वी पोपटाने संधी साधली. घोडीला होणारे पुढचे शिंगरू राजाला देईन, असे वचन त्याने राजासमोर फकिराकडून घेतले.
चतुर पोपट
चांदीचा पिंजरा
तेव्हापासून पोपटाचा थाट मोठा होता. त्याला चांदीचा सुंदर पिंजरा मिळाला. खाण्यापिण्यासाठी चांदीच्या वाट्या मिळाल्या. पिंजरा राजवाड्याच्या जनानखान्यात टांगला होता. तिथे पोपट सगळ्यांचा लाडका झाला. राजाच्या राण्या सतत त्याच्याशी बोलत, खेळत, त्याचे लाड करत. असे दिवस मजेत चालले होते. मग एके दिवशी राजाच्या राण्या पिंजऱ्याजवळ आल्या. “आम्ही दिसायला कशा आहोत?” असे त्यांनी पोपटाला विचारले. पोपटाला कसलाही संशय आला नाही. सगळी थट्टाच आहे, असे त्याला वाटले. तो म्हणाला, एक सोडून सगळ्या फार सुंदर आहेत. आणि त्याने राजाच्या सगळ्यात लाडक्या राणीचे नाव घेतले. ती कुरूप आहे, असे तो म्हणाला. हे ऐकताच ती बेशुद्ध होऊन पडली. शुद्धीवर येताच ती ओरडली, “राजांना बोलवा!” राजाला बोलावणे गेले. “मी फार आजारी आहे,” ती राजाला म्हणाली. “मला या पोपटाचे मांस द्या, नाहीतर मी मरेन.” हे ऐकून राजाला फार वाईट वाटले. पण त्याचे तिच्यावर प्रेम होते, म्हणून त्याने पोपटाला मारायचा हुकूम दिला. “महाराज,” बिचारा पक्षी ओरडला, “मला सहा दिवसांची मुदत द्या. सहा दिवस मला हवे तिकडे जाऊ द्या. त्यानंतर मी नक्की परत येईन, आणि आपण माझे जे कराल ते मान्य करीन, असे वचन देतो.” “मंजूर,” राजा म्हणाला. “पण सहा दिवसांनी परत यायचे, लक्षात ठेव.”
चतुर पोपट
बेटावरची राजकन्या
पोपटाला मोकळे सोडले, आणि तो लगेच उडून गेला. थोडा दूर गेला नाही तोच त्याला बारा हजार पोपटांचा थवा भेटला. सगळे एकाच दिशेने उडत चालले होते. “थांबा, थांबा!” राजाचा पोपट कर्कश ओरडला. “कुठे चाललात?” ते म्हणाले, “मित्रा, आम्ही एका बेटावर चाललो आहोत. तिथली राजकन्या आम्हाला मोती आणि खडीसाखर खाऊ घालते. चल आमच्याबरोबर, आमच्या आनंदात सहभागी हो.” पोपट कबूल झाला आणि त्यांच्याबरोबर गेला. लवकरच ते बेटावर पोहोचले. पक्षी म्हणाले होते, तसेच सगळे होते. मेजवानी संपली आणि बाकीचे पोपट निघाले. तेव्हा राजाचा पोपट आजारी असल्याचे सोंग घेऊन जमिनीवर आडवा पडून राहिला. राजकन्या त्याच्याजवळ आली. “काय झाले, सुंदर पोपटा? आजारी आहेस का? चल माझ्याबरोबर. मी तुझी काळजी घेईन. तू लवकर बरा होशील.” तिने पक्ष्याला स्वतःच्या महालात नेले. त्याच्यासाठी छोटेसे घरटे केले आणि स्वतः त्याची शुश्रूषा केली. तिने त्याला भरपूर मोती आणि खडीसाखर दिली. पण पोपटाने त्यातले काहीच आवडत नसल्याचे दाखवले. “राजकन्ये,” तो म्हणाला, “तुम्ही दयाळू आहात, चांगल्या आहात. तुम्ही आम्हाला मोती आणि खडीसाखर देता. पण माझे मालक, ते महान राजे, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळ्या देशांवर राज्य करतात. हे बेटही त्यांचेच आहे, तुम्हाला माहीत नसले तरी. ते तर स्वतःच्या कोंबड्यांपुढे मोती आणि खडीसाखर टाकतात! तुम्ही त्यांना ओळखत असता तर! अशा राजांशी तुमचे लग्न झाले असते तर! ते तुमच्या योग्यतेचे आहेत, आणि तुम्ही त्यांच्या.”
चतुर पोपट
पाचव्या दिवशी परत
पोपटाच्या बोलण्याने राजकन्येचे मन हलले. ती तिच्या वडिलांकडे, बेटाच्या राजाकडे गेली. त्या राजाला भेटायला जाऊ द्या, आणि जमले तर त्याच्याशी लग्न करू द्या, अशी तिने विनवणी केली. “अशा कामासाठी मी तुला पाठवू शकत नाही,” वडील म्हणाले. “पण मी त्या राजाला पत्र लिहितो आणि ते पोपटाबरोबर पाठवतो. ठरलेल्या दिवशी त्यांनी स्वतः लग्नाला यावे, अशी त्या महान राजांना विनंती करतो. पक्षी म्हणतो ते सगळे खरे असेल, तर ते नक्की येतील. काळजी करू नकोस. तुझ्या लग्नाचे मी बघतो.” राजकन्या तयार झाली, आणि पक्ष्याला पत्र देऊन लगेच त्याच्या मालकाकडे पाठवले. पाचवा दिवस संपायच्या थोडे आधी पोपट उडत राजासमोर आला आणि त्याने पत्र खाली टाकले. “वेळेवर परत आलास,” राजा म्हणाला. “महाराज,” पक्षी ओरडला, “मला मारू नका, अशी माझी विनवणी आहे. मी आपले किंवा आपल्या घरातल्या कोणाचेही काही वाईट केलेले नाही. राण्यांनी मला विचारले, मला त्या कशा वाटतात. मी सांगितले. मी खोटे बोललो नाही. आपल्या एका राणीच्या लहरीपायी आपण मला खरोखर मारणार? मी जगलो तर ती मरणार नाही. तिचा जीव माझ्या मरणावर अवलंबून नाही. आणि तसे असले, तरी मी आपल्याला दुसरी, कितीतरी सुंदर राणी शोधून देऊ शकतो. हे पाहा, जगातल्या एका अतिशय सुंदर राजकन्येच्या वडिलांचे हे पत्र. ते आपल्याला त्यांच्या मुलीचा हात देऊ करत आहेत.” “तू योग्य बोलतोस,” राजा म्हणाला, “आणि तू नेहमी प्रामाणिकपणे वागला आहेस. मी तुला मारणार नाही. तू सांगतोस तसे करीन, या राजकन्येशी लग्न करीन. पण ही माणसे राहतात त्या बेटावर मी पोहोचू कसा?”
चतुर पोपट
समुद्र पार करणारे शिंगरू
“काळजी करू नका, महाराज,” पोपट म्हणाला. “मी विचार केल्याशिवाय हा सल्ला दिलेला नाही. फकिराने आपल्याला शिंगरू देण्याचे वचन दिले होते. ते पाठवायचा त्याला हुकूम द्या. मग प्रवास सोपा होईल.” “ठीक आहे,” राजा म्हणाला, आणि त्याने लगेच शिंगरू मागवले. ते जनावर किती मोलाचे आहे, हे फकिराला माहीत नव्हते. त्याने फारसा विचार न करता ते पाठवून दिले. आता तो श्रीमंत होता. त्याला त्याची काय गरज? आणि इतक्या उदारपणे वागलेल्या राजाला एवढे देणे म्हणजे काहीच नाही, असे त्याला वाटले. मग राजा शिंगरावर बसून बेटाकडे निघाला. पोपट त्याच्या सोबत होता. किनाऱ्यावर पोहोचल्यावर राजाने तो अथांग समुद्र पाहिला आणि त्याचा धीर सुटला. तो परत फिरणार होता. “एवढे पाणी आपण पार कसे करायचे?” त्याने विचारले. “अगदी सहज,” पोपट म्हणाला. “आपण ज्यावर बसला आहात, ते काही साधेसुधे जनावर नाही. त्याच्यावर बसून आपण कुठेही जाऊ शकता. घाबरू नका. त्याला पाण्यात घाला. ते जमिनीवर चालते तितक्याच सहज पाण्यातही चालते.” राजाला धीर आला. त्याने तसे केले, आणि तो लवकरच बेटावर पोहोचला. बेटाच्या राजाने त्याचे आनंदाने स्वागत केले. राजकन्येला तर शब्दांत सांगता येणार नाही इतका आनंद झाला. राजा तिला पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडला. लग्न शक्य तितक्या लवकर व्हावे, असे त्याने सांगितले. सगळ्यांचे एकमत होते. त्यामुळे लवकरच लग्न झाले, आणि सगळे छान पार पडले. मग तो महान राजा आणि त्याची सुंदर नववधू घरी परत निघाले.
चतुर पोपट
ओसाड बेट
दोघेही शिंगरावर बसले होते. वाट दाखवायला पोपट पुढे उडत होता. तो आला होता त्या वाटेने त्यांना परत नेत नव्हता, तर दुसऱ्याच वाटेने. वाटेत एक बेट लागले. तिथे कोणीही राहत नव्हते. “मला इथे विश्रांती घ्यायची आहे,” राजा म्हणाला. “मी फार दमलो आहे.” “कृपा करून थांबू नका,” पक्षी म्हणाला. “इथे मोठा धोका आहे.” “असू दे,” राजा म्हणाला. “विश्रांतीशिवाय मला पुढे जाववत नाही. थोडी झोप घेऊ, मग पुढे जाऊ.” म्हणून राजा आणि राणी किनाऱ्यावर उतरले आणि झोपी गेले. पोपट जवळच्या एका झाडाच्या फांदीवर बसून पहारा देऊ लागला. तासाभरातच एक जहाज त्या बेटाला लागले. त्याचा कप्तान एक श्रीमंत व्यापारी होता. तिथे दोन माणसे झोपलेली त्याने पाहिली. ती कोण आहेत ते पाहायला तो किनाऱ्यावर उतरला. राणीच्या सौंदर्यावर तो भाळला, आणि त्याने तिला उचलून जहाजावर नेले. शिंगरूही नेले. पण राजाला तसेच झोपलेले सोडून दिले. पोपटाने हे सगळे पाहिले. पण ‘आरडाओरडा केला, तर व्यापारी मला गोळी घालेल,’ अशी त्याला भीती वाटली. म्हणून राणी आणि शिंगरू घेऊन जहाज निघून गेले. त्यानंतरच पोपटाने राजाला उठवले. “अरे माझ्या पोपटा!” राजा ओरडला. “तुझे ऐकले असते आणि इथे थांबलो नसतो, तर किती बरे झाले असते! आता मी काय करू? या बेटावर खायला काही नाही. पाण्यापलीकडे नेणारे एकही जनावर नाही. मी काय करू ते सांग. जमले तर मला मदत कर.” “महाराज,” पक्षी म्हणाला, “आता एकच उपाय उरला आहे. हे झाड तोडा आणि समुद्रात टाका. मग त्याच्यामागे स्वतःही पाण्यात उडी घ्या. देवाच्या मनात असेल तिकडे ते आपल्याला घेऊन जाईल. याशिवाय आपण करू शकाल असे मला काहीच दिसत नाही.”
चतुर पोपट
राणी झाली मोतद्दार
राजाने झाड तोडले आणि पक्षी म्हणाला होता तसे केले. देवाच्या दयेने त्याच वेळी एक मोठा गरुड समुद्रावरून उडत होता. त्याने ते झाड पाहिले. झडप घालून त्याने ते राजासकट उचलले. एका जंगलात नेऊन त्याने झाड खाली सोडले. असा राजा वाचला. इमानी पोपटाने सगळे पाहिले होते. “आता इथेच राहा,” तो म्हणाला. “या जागेवरून हलू नका. मी राणीचा आणि शिंगराचा शोध घेऊन परत येतो.” राजाने तसे वचन दिले. खूप शोधल्यावर पोपटाला राणी सापडली. व्यापाऱ्याने तिला स्वतःच्या घरी नेले होते. तिथे ती त्याची मोतद्दार म्हणून राहत होती, त्याच्या घोड्यांची निगा राखत होती. पोपटाला पाहताच तिला आनंदाने रडू आले. “कुठे होतास तू? माझे पती कुठे आहेत? ते जिवंत आहेत ना? लवकर सांग!” पोपटाने तिला सगळे सांगितले. “आत्ताच्या आत्ता परत जा,” ती म्हणाली, “आणि माझी इथे काय अवस्था आहे ते त्यांना सांग. हे दागिने त्यांना ने. अन्न विकत घ्यायला लागतील. त्यांना सांग, लवकर इथे या आणि याच व्यापाऱ्याकडे मोतद्दाराची नोकरी धरा. मग शिंगरावर बसून दोघे मिळून पळून जायचा मार्ग शोधू. एकदा आम्ही त्या शिंगरावर बसलो, की जमिनीवर किंवा समुद्रावर आम्हाला कोणीच पकडू शकणार नाही.” पोपट जमेल तितक्या वेगाने उडत गेला. त्याने राजाला राणीची अवस्था सांगितली, आणि तिला सोडवायला लगेच निघा, असा आग्रह केला. राजा तयार झाला, आणि काही दिवसांतच व्यापाऱ्याच्या घरी पोहोचला. ती भेट किती आनंदाची होती! पुन्हा एकमेकांना पाहायची आशा दोघांनी सोडून दिली होती. पण देवाने त्यांच्यावर दया केली आणि त्यांना एकत्र आणले. त्याच संध्याकाळी राजा आणि त्याची नववधू त्या अद्भुत शिंगरावर बसून शहराबाहेर पडले. वाट दाखवायला पोपट पुढे उडत होता. लवकरच ते राजाच्या देशात पोहोचले. तिथे लोकांनी वाद्ये वाजवून, गाणी गाऊन त्यांचे स्वागत केले. राजा आयुष्यभर सुखाने जगला. पोपटाला मुख्य वजीर केले. राज्य पूर्वीपासून होते तसेच समृद्ध आणि सन्मानाचे राहावे, म्हणून पोपटाने खूप काही केले. ही गोष्ट श्रीनगरमध्ये १८८० च्या दशकात जे. हिंटन नोल्स यांना काश्मिरी भाषेत सांगितली गेली. त्यांनी ती १८८८ मध्ये काश्मीरच्या लोककथांच्या इंग्रजी पुस्तकात छापली. ती सांगणारे होते श्रीनगरमध्ये अमिरा कदलजवळ राहणारे कादिर नावाचे न्हावी.