काश्मीरच्या लोककथा
दोन भाऊ
झाडावरचे पक्षी
एका राजाचे राणीवर फार प्रेम होते. राणीचेही त्याच्यावर तितकेच प्रेम होते. त्यांना दोन मुलगे होते. दोघेही देखणे, हुशार, सुस्वभावी आणि आज्ञाधारक होते. आपल्या आईवडिलांइतके चांगले कोणीच नाही, असे त्या मुलांना वाटे. अशा घरात सुख नांदणारच होते. पण एके दिवशी मृत्यूचे देव यम यांनी आपले कुत्रे, म्हणजे आपले दूत पाठवले. ते कुटुंबातल्या एकाला बोलावून घेऊन गेले. रोज सकाळी राजा राजवाड्याच्या एका सज्ज्यात राणीबरोबर थोडा वेळ बसत असे. त्या शांत वेळी ते दोघे पक्ष्यांची एक जोडी पाहत. ती जोडी घरट्यातल्या पिल्लांसाठी चारा आणत असे. एके दिवशी त्यांना दिसले, नर पक्ष्याबरोबर एक अनोळखी मादी घरट्याकडे उडत येते आहे. तिच्या चोचीत काटे होते. काय झाले ते राजाला जाणून घ्यायचे होते. त्याने एका नोकराला झाडावर चढून पाहायला सांगितले. कळले ते असे. नर पक्ष्याची जोडीदारीण मेली होती आणि त्याने नवी जोडीदारीण आणली होती. आपण न उबवलेल्या पिल्लांसाठी राबायची त्या नव्या मादीची इच्छा नव्हती. म्हणून ती त्यांना खायला काटे आणत होती, त्यांचा काटा काढायला. काटे घशात अडकून पिल्ले मेली. सगळी पिल्ले आपल्या आईच्या कलेवरावर पडलेली सापडली.
दोन भाऊ
राजाचे वचन
हे ऐकून राजा आणि राणी दोघांनाही फार वाईट वाटले. “माणसांचेही या पक्ष्यांसारखेच होते का?” राजाने विचारले. “हो,” राणी म्हणाली. “पण आपले तसे कधी न होवो. मला वचन द्या, मी आधी मेले, तर तुम्ही पुन्हा लग्न करणार नाही.” “प्रिये, तुझा हात दे,” राजा म्हणाला. “तू जिवंत असो किंवा नसो, मी दुसरी बायको कधीही करणार नाही, असे मी गंभीरपणे वचन देतो. या बिचाऱ्या पिल्लांचे जे झाले, ते आपल्या दोन मुलांचे होऊ नये.” राणीला धीर आला. तिचे राजावरचे प्रेम आणखीच वाढले. आणि काय आश्चर्य, थोड्याच दिवसांत राणी मरण पावली. राजाला किती दुःख झाले! काही काळ लोकांना वाटले, तोही दुःखाने प्राण सोडणार. पण शेवटी तो सावरला आणि पुन्हा राज्यकारभार पाहू लागला. योग्य काळ गेल्यावर वजीर, दरबारी आणि इतर मोठ्या माणसांनी आपल्यातल्या काही जणांना निवडले. त्यांना राजाशी पुन्हा लग्नाविषयी बोलायचे होते. हे काम कठीण आणि नकोसे होते. आधी राजा त्यांना भेटायलाही तयार नव्हता. पण ते पुनःपुन्हा विनवत राहिले. शेवटी त्याने विचार करायचे कबूल केले, आणि अखेर तो तयार झाला. मुख्य वजिराच्या मुलीचे नाव सुचवले गेले. ते राजाने मान्य केले आणि लग्न झाले.
दोन भाऊ
तलवारी झाल्या लाकडाच्या
तो दिवस वाईटच ठरला. सगळ्यांना वाटले होते तसेच झाले. नव्या राणीला लवकरच दोन्ही राजकुमारांचा मत्सर वाटू लागला. ती त्यांच्याविरुद्ध कारस्थाने करू लागली. त्यांनी तिला खूश ठेवायचा खूप प्रयत्न केला. तिने सांगण्याआधीच ते तिचे काम करत. कोणत्याही बाबतीत तिच्या मनाविरुद्ध वागत नसत. पण काही उपयोग झाला नाही. राणीला त्यांचा तिटकारा होता. त्यांचा नाश करून त्यांना घालवून देण्याच्या दिवसाची ती वाट पाहत होती. राजाचे आपल्यावर फार प्रेम आहे, तो आपल्यासाठी काहीही करील, हे दिसेपर्यंत ती थांबली. मग ती राजकुमारांबद्दल वाईट बोलू लागली. “ते माझे मुळीच ऐकत नाहीत,” ती राजाला सांगू लागली. “माझ्याशी फार उद्धटपणे बोलतात. तुम्ही माझ्याशी इतके चांगले, प्रेमाने वागत नसता, तर मी हे कधीच सहन केले नसते.” राजाला ते खरे वाटले. तो संतापला. त्याने तत्काळ हुकूम दिला, राजकुमारांना गुपचूप रानात नेऊन मारून टाका. वडिलांच्या हुकुमाबद्दल प्रश्न विचारायची त्या दोघा तरुणांना कधी सवयच नव्हती. ते आनंदाने सैनिकांबरोबर निघाले. त्या क्रूर हुकुमाची त्यांना काहीच कल्पना नव्हती. घोड्यावरून जाऊन रान पाहून यावे, अशी वडिलांची इच्छा असेल, असे त्यांना वाटले. जागेवर पोहोचल्यावर सैनिकांनी तलवारी उपसल्या, जणू वार करणार. राजकुमार थक्क झाले. काय करावे ते त्यांना सुचेना. “हे भगवंता, आम्हाला वाचव!” ते ओरडले. त्यांची प्रार्थना ऐकली गेली. पोलादी तलवारी लाकडाच्या झाल्या. सैनिकांच्या कठोर मनात दया आली. राजकुमारांना मारण्याचे धाडस त्यांना झाले नाही. त्यांनी त्यांना सोडून दिले.
दोन भाऊ
सुदाब्रोर आणि बुदाब्रोर
देवाने दया केली होती. राजकुमारांनी देवाचे आभार मानले. मग घोडे पळतील तितक्या वेगाने ते निघून गेले. आता पुन्हा आपल्या देशात परत जायचे नाही, असे त्यांनी ठरवले. दूरदूर, भरधाव जात ते एका झऱ्यापाशी आले. झऱ्याचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ होते. तिथे खाऊन विश्रांती घ्यायचे त्यांनी ठरवले. दोघांनी एकाच वेळी झोपायचे नाही, असे त्यांनी ठरवले. न जाणो एखादा दरोडेखोर किंवा जंगली जनावर येईल आणि त्यांना व त्यांच्या घोड्यांना मारून टाकील. म्हणून आधी मोठा भाऊ झोपला आणि धाकटा पहारा देत राहिला. तो पहारा देत असताना सुदाब्रोर आणि बुदाब्रोर नावाचे दोन पक्षी आले. ते जवळच्या एका झाडावर बसले आणि बोलू लागले. “ते पाहा,” सुदाब्रोर म्हणाला, “झऱ्यावरच्या त्या झाडावर दोन गाणारे पक्षी आहेत. ते कोणते पक्षी आहेत, ठाऊक आहे का?” “हो,” बुदाब्रोर म्हणाला. “ते फार अद्भुत पक्षी आहेत. मी ऐकले आहे, त्यांपैकी एकाचे मांस जो खाईल, तो राजा होईल. आणि दुसऱ्याचे मांस जो खाईल, तो वजीर होईल आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होईल. रोज सकाळी तो जिथे झोपला असेल, तिथे त्याच्याखाली त्याला सात रत्ने सापडतील. ती इतकी मौल्यवान असतील, की त्यांची किंमत कोणालाच करता येणार नाही.” हे ऐकून धाकटा राजकुमार हरखून गेला. त्याने लगेच त्या दोन पक्ष्यांवर बाण मारला आणि त्यांना ठार केले. त्याने दोन्ही पक्षी शिजवले. एक स्वतः खाल्ला आणि दुसरा भावासाठी ठेवला. मोठा भाऊ जागा होताच त्याने तो खाल्ला.
दोन भाऊ
झऱ्यातला महासर्प
दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुढच्या प्रवासाला निघाले. वाटेत धाकट्या भावाला एकदम आठवले, आपला चाबूक मागेच राहिला. तो चाबूक त्याला फार मोलाचा होता. म्हणून तो चाबूक आणायला परत फिरला. झऱ्याजवळ त्याला चाबूक सापडला. तो उचलायला तो घोड्यावरून उतरत होता, तेवढ्यात पाण्यातून एक प्रचंड महासर्प बाहेर आला आणि त्याच्या पायाला डसला. राजकुमार बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. कित्येक तास तो तसाच पडून होता. इकडे वाट पाहून मोठा भाऊ कंटाळला. संध्याकाळपर्यंत भाऊ आपल्याला गाठेल, असे समजून तो पुढे निघाला. तो एका शहरात पोहोचला. तिथला राजा नुकताच वारला होता. पुढचा राजा कोण, यावरून लोकांमध्ये मोठी खळबळ माजली होती. तिथे राजा निवडायची एक रीत होती. ते एक हत्ती शहरभर फिरवत. हत्ती ज्याला निवडील, त्याला ते राजा मानत. मग तो श्रीमंत असो की गरीब, शिकलेला असो की अडाणी, त्यांच्या देशाचा आणि भाषेचा असो की परका. मोठा राजकुमार पोहोचला, तेव्हा नेमका तो हत्ती फिरत होता. त्याला पाहताच हत्तीने त्याच्यापुढे मान लववली. मग लोकांनी त्याला त्या देशाचा राजा म्हणून जाहीर केले आणि राजवाड्यात नेले. त्याने खाल्लेला पक्षी राजा करणारा होता.
दोन भाऊ
जोगी आणि महासर्प
तिकडे झऱ्यापाशी धाकटा राजकुमार असा वाचला. झऱ्याजवळ एक जोगी राहत असत. सहा महिन्यांतून एकदा ते थोडे पाणी न्यायला झऱ्यावर येत. महासर्प राजकुमाराला डसला, त्याच दिवशी नेमकी जोगींची यायची वेळ होती. ते तिथे पोहोचले. तो तरुण निष्प्राण पडलेला पाहून त्यांना दया आली. हे झऱ्यातल्या महासर्पाचेच काम, हे त्यांनी ओळखले. म्हणून त्यांनी एक मंत्र पुटपुटला. झऱ्याचे पाणी आटले आणि तो राक्षसी साप बाहेर आला. “झरा का आटवलास?” महासर्पाने विचारले. “कारण तू या तरुणाला मारलेस,” जोगी म्हणाले. “तू असे का केलेस?” “जोगीबाबा,” महासर्प म्हणाला, “इथे दोन पक्षी नेहमी येत. त्यांच्या गाण्याने सगळा आसमंत भरून जाई. या राजकुमाराने त्यांना मारले. म्हणून मी त्याला डसलो.” “तू चूक केलीस,” जोगी म्हणाले. “ऐक. त्याच्या पायातले विष शोषून घे आणि त्याला पुन्हा जिवंत कर. नाहीतर तुला मरावे लागेल.” “मला क्षमा करा,” महासर्प म्हणाला. “मी तुमची आज्ञा पाळतो.” आणि राजकुमार पुन्हा जिवंत झाला. त्याने जोगींचे आभार मानले आणि तो पुढे निघाला. पण दुर्दैवाने तो चुकीच्या वाटेला लागला. भावाच्या मागोमाग जाण्याऐवजी तो एका खेड्यात पोहोचला. तिथे क्रूर दरोडेखोरांची एक टोळी राहत होती. योगायोगाने तो त्यांच्यापैकीच एका दरोडेखोराच्या घरी गेला आणि रात्रीपुरता आसरा मागितला. तो त्याला आनंदाने मिळाला. त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले आणि उत्तम जेवण दिले. पण रात्री तो झोपला, तेव्हा पलंग त्याच्यासकट जमिनीतून खाली गेला. तो एका घाणेरड्या तळघरात पडला. दरोडेखोर त्या खड्ड्याला “कबर” म्हणत.
दोन भाऊ
दरोडेखोराची मुलगी
एका दरोडेखोराच्या मुलीने त्याला पाहिले नसते आणि तिचे त्याच्यावर प्रेम बसले नसते, तर राजकुमार तिथेच मेला असता. तिला घराचा कानाकोपरा ठाऊक होता. तो परका माणूस कबरीत पडला असणार, हे तिने ओळखले. ती गुपचूप त्याच्याकडे गेली आणि त्याला खायला नेले. त्या बदल्यात राजकुमाराने तिला सात रत्ने दिली. रोज सकाळी ती असे करी आणि दर वेळी तिला सात रत्ने मिळत. रत्ने देणारा पक्षी त्याने खाल्ला होता. प्रत्येक भेटीबरोबर तिचे प्रेम वाढत गेले. ती फार सुंदर होती आणि फार हुशार होती. राजकुमारालाही ती आवडू लागली. जमेल तितक्या लवकर तिच्याशी लग्न करीन, असे त्याने तिला वचन दिले. शेवटी दोघेही तिथून निसटले. त्यांचा चपळ घोडा पळेल तितक्या वेगाने ते समुद्रापर्यंत गेले. तिथे सुटायच्या बेतात असलेल्या एका जहाजावर ते लगेच चढले. प्रवाशांमध्ये एक व्यापारी होता. त्या मुलीच्या सौंदर्याने तो इतका भुलला, की राजकुमाराला मारून तिच्याशी लग्न करायचे त्याने ठरवले. एके दिवशी जहाजाच्या पुढच्या टोकाला तो आणि राजकुमार नर्द खेळत होते. नर्द हा पटावर खेळायचा एक खेळ. थुंकण्यासाठी राजकुमार कठड्यावरून वाकला, आणि व्यापाऱ्याने त्याला ढकलून दिले. नशिबाने त्याची बायको, ती दरोडेखोराची मुलगी, जहाजाच्या एका खिडकीपाशी उभी होती. नवरा खाली पडताना तिला दिसला. तिने हात बाहेर काढून त्याला धरले आणि त्याचा जीव वाचवला.
दोन भाऊ
वजिराची रात्रीची गोष्ट
राजकुमार लपून राहिला. “प्रवास संपेपर्यंत कोणाला काही सांगू नकोस,” असे त्याने बायकोला सांगितले. म्हणून राजकुमार समुद्रात पडल्याची बातमी पसरली, तेव्हा खलाशांना आणि प्रवाशांना फार दुःख झाले. व्यापाऱ्याने तर सगळ्यांपेक्षा जास्त दुःख झाल्याचे सोंग केले. फक्त ती सुंदर बायकोच त्याच्याहून दुःखी दिसत होती. पण तो लवकरच सावरला. तो तिच्यामागे लागला आणि शेवटी त्याने तिला लग्नाची मागणी घातली. “सहा महिने थांबा,” ती म्हणाली. “तोपर्यंत नवऱ्याची काही खबर मिळाली नाही, तर मी तुमच्याशी लग्न करीन.” काही महिन्यांनी जहाज बंदरात पोहोचले. तिथे राजकुमार सगळ्यांसमोर आला. “या व्यापाऱ्याने मला बुडवायचा प्रयत्न केला,” असा त्याने आरोप केला. खटला होईपर्यंत व्यापाऱ्याला तुरुंगात टाकले. योगायोग असा, की ते उतरले ते शहर नेमके मोठ्या राजकुमाराच्या राज्याचीच राजधानी होते. त्या वेळी राजा फार उदास होता. आपल्या भावाचे काय झाले, याचाच विचार तो करत असे. मन रमावे म्हणून त्याने मुख्य वजिराला रोज रात्री एक गोष्ट सांगायचा हुकूम दिला होता. अशा रीतीने भावाची काही खबर कानावर येईल, अशीही त्याला आशा होती. दिवसभरात जे पाहिले-ऐकले, त्यावरूनच वजीर बहुधा आपल्या गोष्टी रचत असे. जहाज आले त्या दिवशी वजिराची मुलगी किनाऱ्यावर गेली होती. तिथे तिने राजकुमाराची, त्याच्या बायकोची आणि त्या दुष्ट व्यापाऱ्याची विचित्र हकीकत ऐकली. संध्याकाळी तिने ती वडिलांना सांगितली. दुसऱ्या दिवशी रात्री वजिराने ती राजाला सांगितली.
दोन भाऊ
पुन्हा घरी
“कुठे आहेत हा राजकुमार आणि त्याची बायको?” राजाने उत्सुकतेने विचारले. “त्यांना ताबडतोब बोलवा. शेवटी माझा हरवलेला भाऊ मला सापडला!” दोघे भाऊ मोठ्या आनंदाने भेटले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते रडू लागले. धाकटा राजकुमार त्या देशाचा मुख्य वजीर झाला. दुष्ट व्यापाऱ्याला फाशी झाली. काही वर्षांनी त्यांच्या वडिलांचे काही दूत त्या देशात आले. “म्हातारे महाराज मुलांना भेटायला आतुर झाले आहेत,” ते म्हणाले. म्हाताऱ्या राजाला स्वतःच्या बायकोचा दुष्टपणा कळला होता. त्याने तिला मृत्युदंड दिला होता. तेव्हा दोघे भाऊ लगेच वडिलांना भेटायला निघाले. ते सुखरूप पोहोचले. त्यांनी म्हाताऱ्या वडिलांची भेट घेतली आणि त्यांच्याशी समेट केला. थोड्याच दिवसांत वडील वारले. मोठा भाऊ त्यांच्या गादीवर बसला. पूर्वी मोठा भाऊ ज्या देशावर राज्य करत होता, तिथे धाकटा राज्य करायला गेला. दोघांनीही उत्तम राज्य केले. त्यांच्या कौशल्याची, न्यायाची आणि दयाळूपणाची कीर्ती सगळीकडे पसरली. ही गोष्ट श्रीनगरमध्ये १८८० च्या दशकात जे. हिंटन नोल्स यांना काश्मिरी भाषेत सांगितली गेली. त्यांनी ती १८८८ मध्ये काश्मीरच्या लोककथांच्या इंग्रजी पुस्तकात छापली. ती सांगणारे होते श्रीनगरमधल्या बनह महालचे शिवराम.